क्रिकेट वर्ल्ड कप, निवडणुकांचे निकाल किंवा एखादा सण.. या दिवशी जसे उत्सवी वातावरण असते, तसे वातावरण आज पुण्यातील बहुतेक शिक्षणसंस्थांमध्ये होते. भारताच्या मंगळयानाच्या यशस्वी उड्डाणाचा आनंद विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी बुधवारी साजरा केला.
फग्र्युसन महाविद्यालयात भारतीय मंगळयान मोहिमेच्या निमित्ताने तीन दिवसीय खगोलशास्त्र विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध देशांच्या मंगळयान मोहिमांची माहिती, यानांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. शुक्रवारपर्यत (२६ सप्टेंबर) हे प्रदर्शन फग्र्युसन महाविद्यालयातील रिक्रेएशन हॉल येथे सुरू राहणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. विज्ञान भारती (पुणे), ज्योतिर्विद्या परिसंस्था आणि फग्र्युसन महाविद्यालय यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकावून, फुगे सोडून मंगळयान मोहिमेचे यश विद्यार्थ्यांनी साजरे केले.
शहरातील अनेक शाळांमध्येही या मोहिमेचे यश साजरे करण्यात आले. सीबीएसईने दिलेल्या सूचनेनुसार सीबीएसईच्या शाळांमध्ये या मोहिमेचे प्रक्षेपण दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना या मोहिमेबाबत माहिती देण्यात आली. त्या शिवायही शाळेच्या पहिल्या तासाला बहुतेक शाळांनी खगोलशास्त्र, अवकाशशास्त्र या विषयांवरील व्याख्याने, सादरीकरण यांचे आयोजन केले होते. अवकाश मोहिमा या विषयावर विद्यार्थ्यांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीही विविध उपक्रमांनी या मोहिमेचे यश साजरे केले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Sep 2014 रोजी प्रकाशित
मंगळयान मोहिमेचे यश शहरात जल्लोषात साजरे!
क्रिकेट वर्ल्ड कप, निवडणुकांचे निकाल किंवा एखादा सण.. या दिवशी जसे उत्सवी वातावरण असते, तसे वातावरण आज पुण्यातील बहुतेक शिक्षणसंस्थांमध्ये होते.

First published on: 25-09-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars mission education institute chearing