मनसे, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महापालिका निवडणुकीत २९ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्या नंतरच्या काही वर्षांतील अवस्था बिकट झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात मनसेला अपयश आले. शहर विकासाच्या मुद्यावर मनसेने सातत्याने भूमिका बदलली. काही मुद्यांवर महापालिकेत तटस्थ राहण्याची किंमतही पक्षाला मोजावी लागली. पक्षाचा जनाधार त्यामुळे कमी झाला. त्यातच मनसेतून मोठय़ा प्रमाणावर पक्षांतर झाल्यामुळे ‘निवडणूकजिंकणे अवघडच आहे’, अशीच मानसिकता कार्यकर्त्यांची झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच आता पक्ष नको व्यक्ती, त्यांची कामे पाहून मत द्या, असा प्रचार मनसेकडून होत आहे.

पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचा करिष्मा आणि नव्याने उदयास आलेल्या मनसेची लोकप्रियता यामुळे पुणेकरांनी मनसेच्या इंजिनाला चांगलाच वेग दिला. महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी मनसेला मिळाली. मात्र त्यानंतरच्या चार-साडेचार वर्षांच्या कालावधीत चित्र पूर्णपणे बदलून गेले. पक्षाची प्रतिमा ढासळण्यास सुरुवात झाल्यानंतर राजकीय भवितव्य लक्षात घेऊन अनेकांनी अन्य पक्षात प्रवेश केला, तर काही कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यात अद्यापही संभ्रमावस्था आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्याची पुरेपूर जाणीव आहे. मात्र नवा विचार, नवा पक्ष आणि नवा सैनिक या त्रिसूत्रीच्या बळावर निवडणुकीत बाजी मारण्याची व्यूहरचना आखण्यास पक्षाकडून सुरुवात झाली आहे. मुलाखतींना मिळालेला मोठा प्रतिसाद हे कारण शहर पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

मनसेच्या काही विद्यमान नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. प्रभागातील घराघरात जाऊन केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवतानाच मतेही मागितली जात आहेत. हीच बाब पक्ष नव्हे तर व्यक्ती पाहून मत द्या, हे स्पष्ट करणारी ठरली आहे. पक्षाबद्दलच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी सावध भूमिका घेण्यात आल्याचेही दिसून येत आहे.

पक्षाची सारी मतदार ही पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यावरच राहणार आहे. किंबहुना तेच मनसेचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये काही प्रभागांसाठी मिळून एकत्रित सभा घेण्याचे नियोजन पक्षाकडून निश्चितच केले जाईल. राज यांच्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील हा देखील त्यामागचा प्रमुख हेतू आहे. काही प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच मनसेला निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. प्रभागनिहाय बैठकांचे सत्रही पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे. एका बाजूला मुलाखती झाल्या असल्या तरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, अशा काही विद्यमान नगरसेवकांकडून प्रभागात प्रत्यक्ष प्रचारही धडाक्यात सुरू झाला आहे, हीच पक्षासाठीची समाधानकारक बाब आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी

  • २००७ ८ नगरसेवक
  • २०१२ २९ नगरसेवक
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns in pune municipal corporation
First published on: 19-01-2017 at 03:05 IST