मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे.. थ्री-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे टू-जीची सेवा मिळणे.. वापर कमी असताना देखील बिलच जास्त येणे.. शेजारी-शेजारी फोन असताना देखील फोन न लागणे.. अशा विविध कारणांमुळे सर्वच मोबाइल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये आयडिया, एअरटेल, रिलायन्स, व्होडाफोन, डोकोमो, युनिनॉर, एअरसेल यांच्यासह सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचा सुद्धा सहभाग आहे.
सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे, त्यामुळे नाममात्र अपवाद वगळता सर्वाकडे मोबाइल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलिकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहीना काही तक्रार असल्याचे आढळून आले आहे. शहरातील अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाइल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाढाच वाचून दाखविला. बीएसएनएल ही कंपनी शासनाची आहे. मात्र, या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे आढळून आले.
‘‘बीएसएनएलची पोस्टपेड सेवा घेतलेली आहे. पण, अनेक वेळा मोबाइलचे नेटवर्क असताना फोन लागत नाही. दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला फोन केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे सांगितले जाते. शहरातील अनेक कार्यालयात व परिसरात बीएसएनएल कंपनीच्या मोबाइलला नेटवर्कच नसते. कमकुवत असल्यामुळे  इंटरनेटला गती मिळत नाही.  त्यामुळे या सोबतच दुसऱ्या कंपनीचे सीमकार्ड वापरावे लागते.’’
– प्रशांत पोळ, बीएसएनएलचे ग्राहक
(बीएसएनएलच्या इतर ग्राहकांनीही त्यांच्या सेवेबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखविला.)
.
‘‘आयडिया मोबाइल कंपनीचे पोस्टपेड सीमकार्ड वापरतो. मात्र, आयडियाकडून मिळणाऱ्या सेवांचा खूप त्रास होते. फोन सुरू असताना अचानक तो कट होतो, अनेक वेळा मधूनच नेटवर्क जाणे आणि नंतर मिस कॉल अलर्ट येणे, कमकुवत नेटवर्कमुळे इंटरनेटला सुविधा योग्य न मिळणे..वॉट्स अ‍ॅप मध्येच थांबणे. इंटरनेटला गती न मिळणे असे प्रकार घडतात. इतर आयडियाच्या ग्राहकांनी कॉल ड्रॉप, अचानक रेंज जाणे, इंटरनेटची थ्री-जी सेवा घेतली असताना ती न मिळणे, बिल जास्त येणे. याबाबत चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर व्यवस्थित उत्तर मिळत नाही.
– सचिन झारगड, आयडिया कंपनीचे ग्राहक
.
‘‘गेल्या काही महिन्यांपासून मध्ये-मध्ये रेंज जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कामाच्या वेळात खूप त्रास होतो. त्यामुळे सोबत दुसऱ्या कंपनीचे एक कार्ड वापरतो. कधी-कधी फोन न लागणे, इंटरनेटला स्पीड कमी असणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, असे प्रकार घडतात.’’
– ओम चाळक, एअरटेलचा ग्राहक
.
‘‘टाटा डोकोमोचे पोस्टपेड कार्ड घेतले आहे. माझा गोल्डन क्रमांक होता. त्यासाठी असणारे शुल्क देखील दिले होते. टाटा डोकोमोची सेवा सुरू केल्यानंतर इंटरनेट मध्ये-मध्ये बंद पडू लागले. वारंवार ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून तक्रार केली. पण, काहीच फायदा झाला. त्याबरोबरच नेटवर्क जात होते. त्यामुळे फोन करता येत नव्हते. त्याबाबतही तक्रार केली. त्या वेळी त्यांनी तुमच्या भागात नेटवर्क कमी असल्याचे सांगितले. लवकरच त्यावर उपाययोजना करू असे देखील सांगितले. पण, काहीही केले नाही. शेवटी ही सेवा बंद केली.’’
– रामदास शिंदे, ‘टाटा डोकोमो’चे ग्राहक
.
‘‘नेटवर्कचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे फोन लागत नाहीत, त्याबरोबर येत नाहीत. न वापरूनही बिल मोठय़ा प्रमाणात येत आहे. इंटरनेट, एसएसएमएस पॅक घेतलेले नसताना देखील दोन हजार रुपयांपर्यंत महिन्याचे बिल आले आहे.’’
– कोमल डोईफोडे, व्होडाफोन कंपनीच्या ग्राहक
.
‘‘फोन न लागणे, रेंज न मिळणे. इंटरनेट स्पीड नसणे. दुसऱ्या व्यक्तीला नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगणे, असा त्रास सातत्याने होत असतो.’’
– रिलायन्सचे ग्राहक
.
 
आपणही त्रस्त आहात का?
मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्कच्या समस्येने आपणही त्रस्त आहात का? असाल तर आपले अनुभव आम्हाला कळवा. आपले नाव, आपण कोणत्या कंपनीचे ग्राहक आहात आणि आपणाला नेमका काय त्रास होत आहे, याबाबत माहिती कळवा. ती loksatta.pune@expressindia.comया ई-मेलवर पाठवा.
– सहायक संपादक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile company network consumer bill
First published on: 04-02-2015 at 03:30 IST