भोसरी-मोशी रस्त्यावरील साईनाथ रुग्णालय..गजबजलेला परिसर..वेळ सकाळी अकराची..रुग्णालयात आग लागली व रुग्णांच्या जिवाला धोका आहे, अशी वर्दी अग्निशामक दलाला मिळते व अवघ्या पाच मिनिटांत दलाचे पथक रुग्णालयात दाखल होते. अर्ध्या तासाच्या नाटय़मय घडामोडीनंतर उलगडा झाला की हा सर्व प्रकार ‘मॉक ड्रिल’चा होता. या निमित्ताने रुग्णालयाच्या सुरक्षिततेची पडताळणी करून घेण्यात आली.
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुहास कांबळे यांच्या अपघात व कृत्रिम सांधेरोपणासाठी नव्याने सुरू झालेल्या साईनाथ रुग्णालयात अग्निशामक दलाचे शांताराम काटे, अमोल खंदारे, स्वप्निल थोरात आदींचे पथक दाखल झाले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर नेमके काय करायचे, याचा अभ्यास या माध्यमातून करण्यात आला. रुग्णालयात मॉक ड्रिल करण्याचे दुर्मिळ उदाहरण या वेळी दिसून आले. आग लागल्याची वर्दी मिळताच दाखल झालेल्या पथकाने तत्परतेने वीजपुरवठा खंडित केला. आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा मारा केला. तत्पूर्वी, रुग्णालय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली होती. या सर्व घडामोडीत रुग्णालयात काही काळ घबराट निर्माण झाली होती. तथापि, हा प्रकार ‘मॉक ड्रिल’ आहे, असल्याचे लक्षात आल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला.