विजेच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागून त्याचा स्फोट झाल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी शहरात घडलेल्या आहेत. ऑईलचा वापर होत असलेल्या ट्रान्सफॉर्मरबाबत अशा घटना घडल्या असताना असे ट्रान्सफॉर्मर अद्यापही शहराच्या विविध भागामध्ये आहेत. हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे छुपा धोकाच असल्याने त्याचा फटका केव्हाही नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे सर्व ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहराच्या मध्यवस्तीमध्ये नारायण पेठेत सहा महिन्यापूर्वी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होण्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये सुदैवाने कोणाला इजा झाली नसली, तरी एका घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेनंतर शहरातील विजेचे ट्रान्सफॉर्मर व त्यांची देखभाल, दुरुस्ती याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वीज वितरणाच्या प्रक्रियेमध्ये ट्रान्सफॉर्मर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ऑईलचा वापर होत असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल योग्य वेळी बदलले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे या ट्रान्सफॉर्मरची सातत्याने देखभाल व दुरुस्ती होण्याची आवश्यकता असते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
शहराच्या विविध भागांमध्ये अद्यापही ऑईलचा वापर होत असलेले ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले आहेत. काही भागांमध्ये ट्रान्सफॉर्मरची योग्य पद्धतीने देखभाल व दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे. हे ट्रान्सफॉर्मर अगदी लोकवस्तीतच असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सामान्य नागरिकांना या यंत्रणेबाबत किंवा संभाव्य धोक्याबाबत कल्पना नसल्याने याबाबत तक्रार करण्यात येत नाही. मात्र, विजेच्या क्षेत्रातील जाणकारांकडून मात्र हा संभाव्य धोका नजरेसमोर आणून दिला जातो आहे.
पुणे व िपपरी- चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यानंतर ‘इन्फ्रा २’ या योजनेअंतर्गत वीजविषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. नव्या वाहिन्या, वीज केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. या योजनेमध्ये अशा प्रकारचे धोकादायक ट्रान्सफॉर्मरची माहिती घेऊन ते बदलण्यात यावेत. वीज यंत्रणा सुरक्षित करण्याच्या दृष्टीनेही योजनेमध्ये भर देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.