पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेली पदयात्रा बुधवारी शहरात दाखल झाली. पदयात्रेमुळे नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. नगर रस्त्यासह, येरवडा, बंडगार्डन रस्ता, संचेती पूल, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदयात्रा बुधवारी पहाटेच्या चारच्या सुमारास नगर रस्त्यावरील खराडी-वाघोली भागात दाखल झाली. हजारो मराठा बांधव पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रेत सहभागी झालेले ट्रक, टेम्पो, जीप अशी वाहने घेऊन सहभागी झाले होते.पदयात्रेतील वाहनांची रांग आठ ते दहा किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचली होती. पदयात्रेत मोठ्या संख्येने वाहने सहभागी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे नगर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता.

नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. जरांगे यांच्या पदयात्रेचा पुणे शहरातील मार्ग नगर रस्ता, येरवडा, सादलबाबा चौक, संगमवाडी पूल, संचेती चौक, वेधशाळा चौक, गणेशखिंड रस्ता, ओैंध असा निश्चित करण्यात आला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास पदयात्रेतील सहभागी झालेल्या मराठा बांधवाचा पहिला जथ्था संचेती चौकात दाखल झाला. त्यानंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

नगर रस्त्यावरील वाहतूक सकाळी सातनंतर बंद करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील शासकीय कर्मचारी, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी सुट्टी घेतली. नगर रस्ता परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. वाहनचालकांची गैरसाेय होऊ नये म्हणून जुना मुंढवा पूलमार्गे वाहतूक वळविण्यात आली. टाटा गार्डन, चंदननगर, विमाननगर, वडगाव शेरीतील अंतर्गत रस्ते सुरू ठेवण्यात आले. या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळनंतर गणेशखिंड रस्त्यासह उपरस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागला.

नगर रस्त्यावर खासगी कंपन्या बंद

विमाननगर, टाटागार्डन, निको गार्डन, फिनिक्स मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या आणि कार्यालये आहेत. बुधवारी सकाळी सातनंतर वाहतुकीस रस्ते बंद केल्याने कर्मचाऱ्यांनी मनस्ताप सोसावा लागला. कार्यालय प्रमुखांनी समाजमाध्यमावर संदेश पाठवून सुट्टी जाहीर केली.

पीएमपी, रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल

नगर रस्ता वाहतुकीस बंद केल्याने पीएमपी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला. साईनाथनगर, आनंदपार्क, शुभम सोसायटी, खराडी, वडगाव शेरी या भागातील प्रवाशांची गैरसोय झाली.

हेही वाचा : २५ जानेवारीला सर्व बाजार समिती राहणार बंद – एपीएमसी प्रशासन 

एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त

पदयात्रेच्या मार्गावर एक हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. दंगलनियंत्रक पथके तैनात करण्यात आली होती. नगर रस्ता ते ओैंध येथील राजीव गांधी पूल दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagar road closed for twelve hours traffic jam amid manaj jarange padyatra pune print news rbk 25 pbs
Show comments