पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या घटनेतील अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा आहे. या घटनेनंतर त्या मुलाच्या वडिलांना आज संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच आमदार सुनील टिंगरे यांच्यावरही विरोधकांनी काही आरोप केले आहेत. यानंतर आता सुनील टिंगरे यांनी माध्यमांशी संवाद साधत या पूर्ण घटनेबाबत स्पष्टीकऱण दिलं आहे.

आमदार सुनील टिंगरे काय म्हणाले?

“रविवारी तीन वाजताच्या दरम्यान माझ्या मतदारसंघात अपघाताची जी घटना घडली. त्या घटनेबाबत मी दु:ख व्यक्त करतो. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला डाग लागावा, अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत. तसेच काही पोस्टदेखील शेअर करत आहेत. रविवारी तीन वाजताच्या सुमारास माझ्या पीएचा मला फोन आला. माझ्या पीएने मला सांगितलं की आपल्या मतदारसंघात कल्याणीनगर भागात एक मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यामध्ये मला एक फोन त्या व्यावसायिकांचाही होता”, असं सुनील टिंगरे म्हणाले.

हेही वाचा : Pune Porsche Accident : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक पोहचले पुणे पोलीस आयुक्तालयात, घडामोडींना वेग

“त्या व्यावसायिकांनी सांगितलं की मुलाचा अपघात झाला असून त्याला तेथील नागरिकांना मारहाण केली आहे. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. त्यानंतर मला ते म्हणाले की आपण या ठिकाणी येता का? त्यानंतर मी घटनास्थळी गेलो आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात गेलो. मात्र, तेथे पोलीस निरीक्षक नव्हते. त्यावेळी त्यांच्याकडून माहिती मिळाली की ते जखमींना घेऊन रुग्णालयात गेले आहेत. त्यानंतर मी तिकडे निघालो असता मला पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की मीच पोलीस स्टेशनला येत आहे. तुम्ही तेथेच थांबा. त्यानंतर ते आले असता मी त्यांना भेटलो आणि घटनाक्रमाची माहिती घेतली”, असं सुनील टिंगरे यांनी सांगितलं.

“पोलीस निरीक्षकांकडून माहिती घेत असताना त्यांनी मला सांगितलं की, या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील कार तो मुलगा चालवत होता. या केसमध्ये गुन्हा दाखल करावा लागेल असं मला त्यांनी सांगितलं. त्यानंतर जी कायदेशीर कारवाई आहे ती करण्यात यावी, असं मी त्यांना सांगितलं. तसंच त्या मुलाच्या कुटुंबालाही ही घटना गंभीर असून तुम्हाला कायदेशीर जावं लागेल, असं मी त्यांना सांगितलं”, असं सुनील टिंगरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आता आम्हाला जेव्हा एखाद्याचा फोन येतो तेव्हा आम्ही मदत करण्यासाठी जात असतो. यामध्ये त्यांचा (घटनेतील मुलाच्या वडीलांचा) आणि आमचा व्यावसायीक संबंध म्हटलं तर फक्त नोकरी आणि मी त्यांच्याकडे काम करायचो, एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे”, असं सुनील टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.