माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुण्यात नव्या वर्षांत माहिती अधिकार कट्टा सुरू केला जाणार आहे. ज्या कोणाला या कायद्याचा वापर करायचा आहे, अशा प्रत्येकाला या कट्टय़ावर मार्गदर्शन मिळेल.
माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व्हावा आणि अगदी सर्वसामान्य माणसालाही या कायद्याचा वापर करता यावा, यासाठी हा उपक्रम सुरू केला जात असल्याचे सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी मंगळवारी सांगितले. माहिती अधिकार कायद्याची ज्याला माहिती हवी आहे, अशी कोणतीही व्यक्ती या कट्टय़ावर येऊन माहिती घेऊ शकेल तसेच ज्यांना या कायद्याचा प्रत्यक्ष वापर करायचा आहे, त्यांनाही कायद्याचा वापर कसा करावा याची माहिती या कट्टय़ावर दिली जाईल.
माहिती अधिकाराचा वापर करताना ज्यांना काही अडचणी येत असतील अशांनाही या कट्टय़ावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या कायद्याचा वापर करणारे काही जण या कट्टय़ावर उपस्थित असतील व उपस्थितांशी चर्चा करून ते शंकांना समाधानकारक उत्तरे देतील. या कट्टय़ाला कोणतेही नाव दिले जाणार नाही. दर महिन्यातील एक गुरुवार, एक शनिवार व एक रविवार असे तीन दिवस हा उपक्रम चालेल. कोणावरही अवलंबून न राहता माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्यांनी या कायद्याचा प्रचार व प्रसार करावा, हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे कुंभार यांनी सांगितले. पुण्याबरोबरच इतर शहरांमध्येही हा उपक्रम राबवण्याची योजना आहे.