गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले डी. एस. कुलकर्णींना उपचारासाठी पुढील ४८ तास ससून रूग्णालयातच ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेऊन वैद्यकीय अहवाल न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. डीएसकेंच्या वैद्यकीय तपासणीवरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डीएसकेंना दि. २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस कोठडीत पडल्याने त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र योग्य सुविधा नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्याची त्यांच्या वकिलाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार डीएसकेंना दीनानाथ रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर आज (मंगळवार) त्यांच्या वैद्यकीय तपासणीवरील बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत डीएसकेंना पुढील ४८ तास ससून रूग्णालयातच उपचारांसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या तब्येतीचा आढावा घेऊन त्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. डीएसकेंची दहा डॉक्टरांनी तपासणी केली.

गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसकेंना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दि. २३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावणीत आली. पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे अचानक पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना लगेच ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या सर्व तपासणी करण्यात आल्या. सर्व रिपोर्ट नॉर्मल असून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.