पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) बांग्लादेशच्या चित्रपट संग्रहालयाकडून बंगाली भाषेतील ‘देवदास’ या चित्रपटाची प्रत सोमवारी प्राप्त झाली. उपलब्ध माहितीनुसार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रथमेश चंद्र बरूआ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बोलपटांमधील पहिलाच देवदास असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या डीव्हीडी प्रतीच्या बदल्यात एनएफएआयने बांग्लादेश चित्रपट संग्रहालयाला दादासाहेब फाळके दिग्दर्शित ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची डीव्हीडी प्रत दिली आहे.
एनएफएआयचे संचालक प्रकाश मकदूम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या तीस वर्षांपासून बंगाली देवदास चित्रपटाची ही प्रत मिळवण्यासाठी एनएफएआयचे प्रयत्न सुरू होते, मात्र या प्रयत्नांना यश आले नव्हते. सोमवारी बांग्लादेशचे माहिती सचिव मुर्तझा अहमद आणि बांग्लादेश चित्रपट संग्रहालयाचे संचालक मोहम्मद जहाँगीर हुसेन यांनी एनएफएआयला भेट दिली. या वेळी एका अनौपचारिक समारंभात या चित्रपटांची देवाणघेवाण करण्यात आली.
१९३५ सालच्या या १ तास ३१ मिनिटांच्या बंगाली ‘देवदास’मध्ये बरुआ यांनी स्वत:च देवदासची भूमिका साकारली आहे. बरुआ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जमुना बरुआ या ‘पार्वती’च्या तर चंद्रबती देवी या ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेत आहेत. बरुआ यांनी तीन भाषांमध्ये देवदास हा चित्रपट बनवला होता. त्यातील हा बंगाली चित्रपट प्रथम बनवला गेला. त्यानंतर त्यांनी हिंदी आणि आसामी भाषेतही देवदास बनवला. या चित्रपटाच्या आधी १९२८ साली देवदास ही कादंबरी एका मूकपटाद्वारे पडद्यावर आली होती. त्यानंतर बरुआ यांचा बंगाली देवदास बोलपटांमधील पहिलाच देवदास मानला जातो.
चित्रपटाची ‘निगेटिव्ह फिल्म’ मिळवण्याचा प्रयत्न 
मकदूम म्हणाले,‘बांग्लादेशकडून मिळालेला हा चित्रपट डीव्हीडी स्वरूपात असून त्याच्या चित्राचा दर्जा ठीक आहे. त्याच्या ‘निगेटिव्ह फिल्म’ची प्रत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. चित्रपटाच्या ‘डिजिटायझेशन’साठी आणि तो जतन करून ठेवण्यासाठी त्या प्रतीचा उपयोग करता येईल. बांग्लादेशच्या चित्रपट संग्रहालयाला आपल्याकडे असलेल्या काही बंगाली भाषेतील चित्रपटांमध्येही रस आहे.’
‘देवदास’ची विविध रूपे पाहण्याची लवकरच रसिकांना संधी
एनएफएआयकडे सध्या देवदास या कादंबरीवर बनलेले पाच चित्रपट आहेत. यात बंगालीसह, हिंदी, तेलुगु देवदास देखील आहे. आगामी काळात रसिकांसाठी ‘देवदास रीव्हिजिटेड’ या महोत्सवाअंतर्गत हे सर्व चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मनोदयही मकदूम यांनी बोलून दाखवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nfai dvd devdas film
First published on: 18-08-2015 at 03:20 IST