scorecardresearch

इतिहासाचा उपयोग उखाळय़ापाखाळय़ा काढण्यासाठीच! ; नितीन गडकरी यांची खंत

गडकरी म्हणाले, देशाची संस्कृती महान असून तिचा संबंध जीवनमूल्यांशी आहे.

पुणे : पूर्वीच्या घटनांपासून प्रेरणा घेऊन भविष्य घडविण्यासाठी इतिहासाचा उपयोग केला गेला पाहिजे. पण, सध्या इतिहासाचा उपयोग केवळ उखाळय़ापाखाळय़ा काढण्यासाठीच केला जात आहे, अशी खंत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केली. इतिहास आणि धर्माचे अर्थ योग्य पद्धतीने पोहोचविण्यात आपण कमी पडलो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये फिरोदिया ट्रस्टने साकारलेल्या ‘समवसरण’ या अ‍ॅम्फी थिएटरचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, राहुल सोलापूरकर, अ‍ॅड. सदानंद उर्फ नंदू फडके, नियामक मंडळाचे अध्यक्ष व फिरोदिया ट्रस्टचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव सुधीर वैशंपायन आणि खजिनदार संजय पवार या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, देशाची संस्कृती महान असून तिचा संबंध जीवनमूल्यांशी आहे. हिंदू, बौद्ध, जैन धर्माचे तत्त्वज्ञान काळानुरुप आहे. संस्कृती, इतिहास, वारसा आणि जीवनमूल्य कालातीत असतात. प्राच्यविद्या कालबाह्य नाही. मात्र, या क्षेत्रात विश्लेषण, प्रशिक्षण आणि प्रबोधन या त्रिसूत्रीने काम करण्याची गरज आहे. इतिहासातून मूल्यांचे संवर्धन होत असते. त्यामुळे ज्ञान कुलूपबंद ठेवण्यापेक्षा ते लोकाभिमुख करणे महत्त्वाचे आहे.

फिरोदिया म्हणाले, पायाभूत सुविधांमध्ये आधुनिकता, संशोधनावर भर, समाजापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग, युवा पिढीला जोडणे आणि आर्थिक बळकटी अशा पाच आघाडय़ांवर संस्था कार्यरत आहे.

या खुल्या रंगमंचावर कलाकारांना मुक्तपणे कलाविष्कार सादर करू द्यावे. सध्या कलाकारांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यांना राजाश्रय नाही आणि लोकाश्रय नाही. त्यामुळे अ‍ॅम्फी थिएटरकडे उत्पन्नचा स्रोत म्हणून याकडे पाहू नका. संगीत, नृत्य, नाटय़ या कलांनी समाज घडतो.

– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitin gadkari inaugurates open amphitheatre in pune zws