पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने चिंताजनक म्हणून जाहीर केलेला मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. त्याबाबत भीती नको, मात्र खबरदारी आवश्यक आहे. ताप, लसिका ग्रंथींना आलेली सूज, त्वचेवरील फोड किंवा जखम अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मंकीपॉक्स आजार सुमारे ७० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. नुकतेच नवी दिल्लीतही त्याचे काही रुग्ण आढळले. ‘ऑर्थोपॉक्सव्हायरस’ या डीएनए विषाणूमुळे या आजाराचा संसर्ग होतो. ताप, कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथींना सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी, घाम, घसा खवखवणे आणि खोकला ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. सहव्याधीग्रस्त रुग्ण आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

नागीण, गोवर, कांजिण्यासदृश लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मंकीपॉक्सवर योग्य वेळी उपचार न झाल्यास न्युमोनिया, सेप्सिस, मेंदुविकार, दृष्टिपटलाचा संसर्ग असे आजार उद्भवतात. या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण तीन ते सहा टक्क्यांपर्यंत आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.  

पुण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य ती काळजी घ्यावी. करोना साथरोग काळाप्रमाणेच सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला मंकीपॉक्ससदृश लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तिचे विलगीकरण करावे. डोळय़ांत वेदना, दृष्टी अधू होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दुखणे, शुद्ध हरपणे, झटके येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, थकवा अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिबंध कसा करावा?

’रुग्णाच्या कपडय़ांशी, अंथरूण-पांघरुणाशी संपर्क टाळावा. रुग्णाचे विलगीकरण करावे.

’हातांची स्वच्छता राखावी, मुखपट्टीचा वापर करावा. उपचार करताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी संरक्षक पोशाख वापरावा.

’त्वचेवरील फोड, पुरळ पूर्ण बरे होईपर्यंत ते झाकले जातील असे कपडे वापरावेत.

’शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे.

प्रादुर्भाव कसा होतो?

’थेट शारीरिक संपर्कातून, जखम, घाव यांतील स्रावामुळे.

’बाधिताच्या शिंकण्या-खोकण्यातून. 

’बाधित प्राणी चावल्यास, बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाल्ल्यास.