scorecardresearch

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक काळा पैसा बाहेर आला – रत्नाकर महाजन

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीची गरज नव्हती

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक काळा पैसा बाहेर आला – रत्नाकर महाजन
काँग्रेसच्या काळात सर्वाधिक काळा पैसा बाहेर आला असा दावा महाजन यांनी केला आहे.

नोटबंदीमुळे काहीच साध्य झालं नसून काँग्रेसच्या काळात सर्वाधिक काळा पैसा उघड झाला असल्याचं मत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केलं. नोटाबंदीच्या घटनेला बुधवारी वर्ष पूर्ण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी महाजन यांनी नोटाबंदीच्या निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. ८ नोव्हेंबर २०१६ हा काळा दिवस आहे. आपल्याच मंत्री मंडळाला खोलीत कोंडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला. तीन ते चार महिन्यांतच हा निर्णय फसल्याचे लक्षात आले. या निर्णयातील एकही हेतू साध्य झालेला नाही, असे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले की, ज्यावेळी काळ्या पैशाचा विषय येतो, त्यावेळी हे सरकार वेळ मारून नेताना दिसते आहे. वेळोवेळी आम्ही दोन लाख कंपन्यांना टाळं ठोकल आहे असं सांगण्यात येत. परंतु, आपल्या देशात कंपन्या आहेतच किती? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकार दिशाभूल करत असल्याचे म्हटले. सरकार आकडेवारीमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. दोन लाख कंपन्यांना टाळं लावलं असेल तर त्यात दोन वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या नितीन गडकरीच्या दोनशे कंपन्यांची नावे आहेत का? हे पाहणे महत्वाचे असेल, असेही ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेतील काळा पैसा उघड करण्यासाठी काँग्रेसच्या काळात प्रयत्न झाले नाहीत, असा प्रचार करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी केलेला हा प्रचार चुकीचा होता. काँग्रेसच्या काळात सर्वाधिक काळा पैसा बाहेर आला असा दावा त्यांनी केला. यासाठी त्यांनी काळा पैसा बाहेर काढल्याची आकडेवारी सांगितली. २०१२-१३ मध्ये २९ हजार ६३० कोटी, २०१३-१४ मध्ये १ लाख १ हजार १८३ कोटी, २०१४-१५ मध्ये २३ हजार १०८ कोटी, २०१५-१६ मध्ये २० हजार ७२१ कोटी आणि २०१६-१७ मध्ये २९ हजार २११ कोटी काळा पैसा बाहेर आला. या आकडेवारीवरुन नोटाबंदीसारखा टोकाचा निर्णय न घेता सुद्धा काळा पैसा कायद्यानुसार बाहेर काढता यतो हेच सिद्ध होते, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-11-2017 at 16:40 IST

संबंधित बातम्या