‘‘रोमँटिसिझम नय्यरसाहेबांच्या सर्व रचनांचा जणू आत्माच आहे. इथे नय्यरसाहेब इतर संगीतकारांच्या तुलनेत वेगळेच जाणवतात. रसिकांनी, समीक्षकांनी त्यांना ‘ऱ्हिदम किंग’ ही पदवी बहाल केली. पण, मी त्याला थोडी ‘मेलडी’चीही डूब देऊ इच्छितो. त्यांची मेलडी कधीही जुनी होणारी नाही. ती सदैव ताजीतवानी चिरतरुणच राहील, आणि रोमँटिसिझम तर आहेच. म्हणूनच मी नय्यरसाहेबांचे वर्णन करीन- मेलडियसली रोमँटिक किंग ऑफ ऱ्हिदम.!’’ ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याविषयीची ही भावना आहे ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांची.
भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील स्वतंत्र शैलीचे प्रतिभावान संगीतकार ही नाममुद्रा उमटविलेले ओ. पी. नय्यर यांची गीते आणि या गाण्याचे ज्येष्ठ पं. शिवकुमार शर्मा यांनी केलेले रसग्रहण असे अनोखे कॉफी टेबल बुक रसिकांच्या भेटीला येत आहे. ओ. पी. नय्यर यांच्या सहवासात प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी टिपलेल्या त्यांच्या प्रकाशचित्रांसह ओपींची गाजलेली ५६ चित्रपटगीते आणि शिवजींचे रसग्रहण असे या कॉफी टेबल बुकचे स्वरूप आहे.
 या संकल्पनेविषयी पाकणीकर म्हणाले, की १९८३ पासून मी ओ.पी. नय्यर यांच्या सहवासात आलो. त्यांच्या घरी, रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये आणि ते जेव्हा पुण्याला आले तेव्हा त्यांची असंख्य प्रकाशचित्रे टिपली आहेत. त्यातील काही प्रकाशचित्रांच्या समावेशासह नय्यरसाहेबांच्या कारकिर्दीतील निवडक ५६ गीतांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ओ. पी. नय्यर यांचे सुहृद, त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी काम केलेले वादक, स्वत: एक नामवंत संगीत दिग्दर्शक आणि अभिजात संगीतातील विश्वविख्यात कलाकार अशा चार भूमिकांतून पं. शिवकुमार शर्मा या पुस्तकामध्ये सहभागी झाले आहेत. या गीतांची सीडी शिवकुमार शर्मा यांना पाठविली. गाण्याचा मुखडा ऐकून त्यांनी केलेले रसग्रहण ध्वनिमुद्रित करून ते शब्दबद्ध केले आणि हे पुस्तक आकाराला आले.
ओ. पी. नय्यर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरुवारी (१६ जानेवारी) ‘ओ. पी. नय्यर- क्या बात है इस जादूगर की..’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. शिवकुमार शर्मा यांच्याच हस्ते होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ६.१५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ओ. पी. नय्यर यांच्यावरील दृक-श्राव्य कार्यक्रम होणार आहे.