लहानपणी मातृभाषा पक्की व्हायच्या आधीच शाळेच्या निमित्ताने होणारी दुसऱ्या भाषांची ओळख हा मुलांच्या वाचन क्षमतेतील महत्त्वाचा अडसर ठरतो आहे. वाचन आणि लेखनात अडचणी असलेल्या मुलांच्या तक्रारी त्यांची भाषा पक्की नसल्यामुळे आहेत, की त्यांना शैक्षणिक अक्षमता (प्युअर लर्निग डिसअॅबिलिटी) आहे, हे पडताळून पाहण्यासाठी शैक्षणिक अक्षमतेवर उपचार करणाऱ्या शिक्षकांना विशेष लक्ष द्यावे लागत आहे.
नोव्हेंबर महिना ‘शैक्षणिक अक्षमता जनजागृती महिना’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘डॉ. अंजली मॉरिस एज्युकेशन अँड हेल्थ फाउंडेशन’तर्फे घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र येथे ‘ओव्हरकमिंग लर्निग डिसअॅबिलिटीज’ या माहितीपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. उमा कुलकर्णी आणि प्रशिक्षण व्यवस्थापक शीतल कापरे यांनी शैक्षणिक अक्षमतेविषयाच्या काही मुद्दय़ांवर प्रकाश टाकला.
कापरे म्हणाल्या, ‘‘शिक्षणातील अक्षमतेची तक्रार घेऊन आलेल्या सर्वाधिक मुलांमध्ये वाचन आणि लेखनातील अडचणीच बघायला मिळतात. त्याखालोखाल गणितातील आकडेमोड करण्यात अडचणी येणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे, चंचलता अशा तक्रारी दिसतात. साधारणपणे पहिली ते पाचवीच्या वर्गातील मुलांमध्ये हे दिसून येते. या मुलांच्या बाबतीत शैक्षणिक अक्षमतेचे निदान करताना भाषेचा अडसर लक्षात घेणे खूप महत्त्वाचे ठरते. भाषा पक्की नसली, तरी वाचन, लिखाण आणि एकूणच भावना व्यक्त करण्यात मुलांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मुलाला केवळ भाषेची अडचण आहे, की त्याला शैक्षणिक अक्षमता आहे हे निश्चित करावे लागते.’’
मातृभाषा पक्की होण्याच्या आधीच दुसऱ्या भाषा शिकणे हे देखील भाषेच्या अडचणीचे एक कारण असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘घरातल्या मंडळींबरोबर मूल एका भाषेत बोलत असते, तर शाळेतली भाषा वेगळी असते. हल्ली कामाच्या निमित्ताने अनेक कुटुंबांना एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागते. यात पालकांची चूक आहे असे म्हणता येणार नाही. तरीही आधी बालकाची मातृभाषा पक्की झाल्यास भाषेच्या अडचणी कमी होऊ शकतील.’’
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 
शैक्षणिक अक्षमतेची ठळक लक्षणे –
– लिखाणात एकाच मजकुरात एकाच शब्दाचे स्पेलिंग वेगवेगळे लिहिणे
– लक्षात न राहणे
– वाचनात वारंवार चुका करणे
– अनेक गोष्टी एकाच वेळी करताना अडचणी येणे
 
 
‘ओव्हरकमिंग लर्निग डिसअॅबिलिटीज’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र येथे शनिवारी देखील (८ नोव्हेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. संस्थेतर्फे सध्या ४०० मुलांना शैक्षणिक अक्षमतेसंबंधी मार्गदर्शन दिले जात आहे. संस्थेविषयीची अधिक माहिती http://www.morrisfoundation.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overcoming learning disabilities
First published on: 08-11-2014 at 03:25 IST