प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या वेगळ्या शैलीतील चित्रांचे प्रदर्शन गुरुवारपासून (१ मे) भरविण्यात येत आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या कर्नाटक दौऱ्यामध्ये भावलेल्या कल्पना या चित्रांतून साकारल्या आहेत. कलाछाया संस्थेच्या (पत्रकारनगर रस्ता) दर्पण कलादालन येथे रविवापर्यंत (४ मे) दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनाविषयीचे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत.
काही गोष्टीच अशा असतात की,
साध्या भाषेत थेट मांडाव्यात. फार विचार करत बसू नये.
कॅनव्हास धरावा ईझलवर नि ओतावं मनातलं.
वाकडय़ा वाटेने जाऊन, पाहणाऱ्यालाही फार विचार करायला लावत बसू नये.
थेट चित्रात नेऊनच बसवावं!
भर पावसात मुलं नाचतायत, हुंदडतायत.
चिखलात फुटबॉल खेळतायत,
राडे घालतायत.
चिखलपाण्यानं पचपचीत झालेल्या उतारावर चकोऱ्या खेळतायत.
ताईला म्हशीच्या पाठीवर बसवून भर उन्हातसुद्धा हातातल्या काठीशी खेळत खेळत
दादा मजेत पुढं चाललाय.
राजस्थानी कुटुंब,
धंद्याचं ‘मटेरियल’ म्हणून रंगीत गोंडामाळांनी बेफाम सजवलेले उंट,
नजर ठरेपर्यंत अथांग पसरलेलं वाळवंटाचं पिवळं काहूर,
माथ्यावरच्या भगभगत्या सूर्याचा चटका सोसत, डोईवरचा पदर इंचभरही ढळू न
देता, हंडाभर पाण्यासाठी जिवाच्या आकांतानं हातपंप हापसणाऱ्या बाया,
कातळाला तळाशी ठेवून
माथ्यावरचा चांदतारा मिरवणारी वयस्कर सफेद मशीद,
तितकाच वयस्कर, वाकलेला हिरवा फकीर
सोबतीला मुलं नि उपाशी, भटकी कुत्री.
इतिहास पोटात घेऊन उभं असलेलं खिन्न देऊळ,
पाखरांसाठी झोळी रिकामी करतो साधू नि मुलांना देतो पंख.
साऊथला जाऊन पाषाणशिल्प न्याहाळावीत
भारतीय मंदिरशिल्पकलेला नमस्कार म्हणून डायरी खरडावी शाईच्या पेनानं
‘आपल्याला’ दिसतं तसं, येतं तसं चित्रं काढावं.