अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर डोमिसाइल आणि नॉन-क्रिमिलेयरसाठी पालक आणि विद्यार्थ्यांना प्रशासनानने वेठीस धरले असून सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत थांबूनही सुमारे दीडशे जणांना सोमवारी दाखले मिळालेले नव्हते.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मंगळवापर्यंत मुदत आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाकडून मुळातच मुदत वाढवून देण्यात आली आहे. मात्र, चेंगट कारभारामुळे अजूनही अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळेलेली नाहीत. विविध दाखले मिळवण्यासाठी शिवाजीनगर गोदामामध्ये पालकांनी गर्दी केली होती. अगदी पंधरा तास थांबूनही अनेकांना कागदपत्रे मिळालेली नाहीत. कागदपत्र मिळण्यासाठी यापूर्वीची तारीख देण्यात आली असूनही त्यांना दाखले मिळाले नसल्याची तक्रार अनेक पालकांनी केली. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याचेही पालकांनी सांगितले. काही पालकांना तर ‘तुमचा अर्जच मिळत नाही, त्यामुळे उद्या या’ असे उत्तर देण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. कागदपत्रे सादर करण्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे हातात मिळण्याबाबत अनिश्चितता असल्यामुळे पालक अक्षरश: रडकुंडीला आले होते.
याबाबत ओमप्रसाद सोनावणे यांनी सांगितले, ‘‘अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. या आधीच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळण्यासाठी १२ तारखेलाच अर्ज केला आहे. मात्र, अजूनही सर्टिफिकेट मिळालेले नाही. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कागदपत्रे मिळण्यासाठी थांबलो आहोत. मात्र, आज सर्टिफिकेट मिळणार का, याबाबत अनिश्चितता आहे. कर्मचारी आणि अधिकारी उद्धट उत्तरे देत आहेत. सर्टिफिकेट आज मिळणार का, असे विचारल्यानंतर ‘जास्त गोंधळ केलात, तर सुरू असलेले कामही बंद करू’, अशी धमकी आम्हाला देण्यात आली. आज कागदपत्रे मिळाली नाहीत, तर उद्या प्रवेशासाठी नोंदणी करता येणार नाही, त्यामुळे आज कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2013 रोजी प्रकाशित
डोमिसाइल, नॉन-क्रिमिलेयरसाठी पालक आणि विद्यार्थी वेठीला
पालक आणि विद्यार्थ्यांना प्रशासनानने वेठीस धरले असून सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत थांबूनही सुमारे दीडशे जणांना सोमवारी डोमिसाइल आणि नॉन-क्रिमिलेयर दाखले मिळालेले नव्हते.

First published on: 18-06-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents and students still waiting for domiciled and non creamy layer certificate