महापालिकेच्या वाहनतळांवर मासिक पासची विक्री दुप्पट दराने

महापालिकेने खासगी ठेकेदारांना चालवण्यास दिलेल्या शहरातील बहुतेक सर्व वाहनतळांवर पुणेकरांची दैनंदिन लूट होत असतानाच…

महापालिकेने खासगी ठेकेदारांना चालवण्यास दिलेल्या शहरातील बहुतेक सर्व वाहनतळांवर पुणेकरांची दैनंदिन लूट होत असतानाच जे नागरिक मासिक पास घेऊन या तळांवर गाडय़ा लावतात, त्यांचीही फार मोठी लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महापालिकेने शहरात उभारलेल्या वाहनतळांवर दुचाकी तसेच चारचाकी वाहने प्रतितासाचे भाडे आकारून लावता येतात. तसेच त्या त्या भागात राहणाऱ्या किंवा नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने उभी करणे सोयीचे व्हावे यासाठी मासिक पासचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाहनतळांवर दुचाकीसाठी प्रतितास दोन रुपये आणि चारचाकीसाठी प्रतितास पाच रुपये असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्याबरोबरच मासिक पासचे शुल्क दुचाकीसाठी १५० रुपये आणि चारचाकीसाठी ४५० रुपये असे निश्चित आहे. वाहनतळांचे ठेके घेतलेल्या व्यावसायिकांनी याच दराने शुल्काची आकारणी केली पाहिजे, असे बंधन त्यांच्यावर आहे.
प्रत्यक्षात यातील बहुतेक सर्व वाहनतळांवर वाहनचालकांकडून सर्रास जादा दराने आकारणी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दोन-चार तासांसाठी वाहन उभे केल्यास जशी लूट केली जाते, त्याच पद्धतीने मासिक पास देतानाही ठेकेदार मनमानी पद्धतीने दर आकारणी करत आहेत, असे निवेदन सजग नागरिक मंचतर्फे सोमवारी महापालिका आयुक्तांना देण्यात आले. दुचाकींचा मासिक पास २०० ते ४०० रुपयांना, तर चारचाकींचा मासिक पास ६०० ते एक हजार रुपयांना विकला जातो, अशी माहिती संघटनेचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तशा तक्रारी अनेक वाहनचालकांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील मूठभर ठेकेदारांवर नियंत्रण आणण्यात महापालिकेला अपयश आल्यामुळेच ही लूट होत असून कराराचे पालन न करता वाहनचालकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. ठेकेदारांनी पालिकेबरोबर केलेल्या करारानुसार वाहनतळांच्या जागी मोठय़ा अक्षरात ऑईलपेंटने दरपत्रक रंगवण्याची व ते नागरिकांना सहजपणे दिसेल अशा पद्धतीने लावण्याची सक्ती आहे. तसेच निविदेतील अटींची माहिती देणारा फलक लावणेही बंधनकारक आहे. सर्व ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणाही बसवणे आवश्यक आहे. मात्र, या अटींसह करारातील इतरही अनेक अटींचे सरसहा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
अशी होते वाहनचालकांची लूट

  • – दुचाकीचा मासिक पास १५० रुपये प्रत्यक्षात आकारणी २०० ते ४०० रुपये
  • – चारचाकींचा मासिक पास ४५० रुपये प्रत्यक्षात आकारणी ६०० ते हजार रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pay and park monthly pass parking pmc

ताज्या बातम्या