पिंपरी भाजपमध्ये असलेली मुंडे-गडकरी गटातील टोकाची गटबाजी, एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते, दुभंगलेला पक्ष व त्यामुळे होणारी कार्यकर्त्यांची फरफट, असे चित्र अनेक वर्षांपासून आहे. गटबाजी थांबवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही काडीचाही फरक पडला नाही. मात्र, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी अनपेक्षितपणे दोन्ही गट एकत्र आले. आमच्यात गटबाजी कधी नव्हतीच, पेपरवालेच भांडणे लावतात, असा जावईशोधही त्यांनी लावला.
पिंपरी भाजपमध्ये मुंडे व गडकरी समर्थक अशी विभागणी आहे. शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे मुंडे गटाची, तर पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवारांकडे गडकरी गटाची धुरा आहे. दोन्ही गटाने शक्य तिथे एकमेकांच्या पायात पाय घालण्याचे राजकारण केले आहे. शहराध्यक्ष, कार्यकारिणी, पक्षाचे कार्यक्रम, भोसरी की पिंपरी मतदारसंघ अशा अनेक मुद्दय़ांवर दोन्ही गटात तीव्र मतभेद आहेत. त्यावरून वेळोवेळी संघर्ष झाला, त्याचे पडसाद प्रदेशापर्यंतही गेले. अलीकडे, थोडे वातावरण निवळत असतानाच पिंपरी आयुक्तांच्या विषयावरून पक्षातील ‘वरवरची एकजूट’ही दिसून आली. आयुक्तांची कार्यपध्दती चांगली आहे, त्यांची बदली होता कामा नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ, अशी पक्षाची भूमिका पवार व खाडे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत मांडली. अमर साबळे, राजू दुर्गे, मोहन कदम, अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, उमा खापरे, प्रमोद निसळ, अनुप मोरे, अपर्णा मणेरीकर असे दोन्ही गटातील पदाधिकारी या वेळी हजर होते. आमच्यात गटबाजी नाही. भाजप हा एकच गट आहे. शहराध्यक्षांना डावलून काहीही केले जात नाही. पक्षात समांतर काहीही चालत नाही. शहराध्यक्षांच्या संमतीने सगळी कामे होतात. आम्ही एकच आहोत, असे एकनाथ पवार म्हणाले, त्यास खाडेंनी मान डोलावून दुजोरा दिला. आमच्यात भांडणे नाहीत, तसे चित्र पेपरवाले रंगवतात. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमावर भोसरीकरांनी बहिष्कार टाकला नाही, असे सांगत आयुक्तांना पाठिंबा देण्याविषयी काहींचे वेगळे मत असले तरी पक्षात लोकशाही आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. भाजपचा पालिका सभागृहात काही ‘आवाज’ नसला तरी आम्ही बोलतोच ना. पालिकेत जाऊन आम्ही तडजोडी करत नाही, असे सूचक विधान पवार यांनी केले.