पुणे/लोणावळा : मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करताच, भेगडे यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनीही पदांचे राजीनामे देऊन भेगडे यांना समर्थन दिले आहे.

मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. भेगडे यांची महामंडळावर वर्णी लावून त्यांच्या नावावर फुली मारल्याचे स्पष्ट झाले होते. पण, भेगडे यांनी महामंडळ नाकारून निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका घेतली. तसेच, अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा : ‘कसब्या’त दोन्ही बाजूंचा कस, महाविकास आघाडीत बंडखोरी, महायुतीमध्ये नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका प्रारंभी जाहीर करण्यात आली होती. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित असून, त्याचे नाव दोन दिवसांत जाहीर केले जाईल, असा दावाही करण्यात आला होता. मात्र, कोणत्या पक्षाला मावळची जागा सोडायची, यावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला. या परिस्थितीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने भेगडे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या सूचनेनुसार हा पाठिंबा देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी दिली.