शिवाजी खांडेकर, पिंपरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना दिले आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीतील छोटय़ा-मोठय़ा तेरा गुन्हेगारी टोळ्यांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले असून त्या टोळ्यांमधील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करून या टोळ्या मोडीत काढण्याची कारवाई आयुक्तांनी सुरू केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दी तेरा गुन्हेगारी टोळ्या सामाजिक शांतता भंग करून दहशत पसरवित असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे लक्षात आले आहे. या टोळ्यांमधील अंतर्गत वादामुळे खून, खुनाचे प्रयत्न असे प्रकार अधूनमधून घडत असतात. या प्रकारांना अटकाव घालण्यासाठी आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणी, दरोडा-खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना सतर्क करून गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. परिमंडल दोनच्या (भोसरी, चाकण, चिखली, तळेगाव) अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून आतापर्यंत ३१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच परिमंडल एकच्या हद्दीतील (वाकड, हिंजवडी, सांगवी) पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून साडेतीन महिन्यांत ११ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय झोपडपट्टी दादा तसेच मोक्का अंतर्गत काही गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. तेरा गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्कात  असणाऱ्या भुरटय़ा गुन्हेगारांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.

पोलिसांनी प्रत्येक गुन्हेगारी टोळीतील गुंडांची तपशीलवार माहिती संकलित केली असून त्यांच्या हालचालीवर त्यांच्या घरापासूनच नजर ठेवली जात आहे. काही गुन्हेगारी टोळ्यांनी पोलिसांच्या कारवाईचा धसका घेऊन शहरातून पलायन केले आहे. निगडी, चिंचवड, वाकड, आकुर्डी, पिंपरी, देहूरोड, भोसरी, दिघी भागामध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या अधिक सक्रिय आहेत. या टोळ्यांमधील गुन्हेगारांकडून नागरिकांना धमकावणे, बेकायदा शस्त्र बाळगून दहशत पसरविणे, खंडणी वसुली आदी प्रकार केले जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.

पिंपरी पोलीस आयुक्तालयातील छोटय़ा-मोठय़ा १३ गुन्हेगारी टोळ्यांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. गुन्हेगारी टोळ्यांमधील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तडीपारी किंवा इतर कठोर कायद्याद्वारे कारवाई करून गुन्हेगारी टोळ्या मोडीत काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

 – आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी

समाजमाध्यमांवरही नजर

गुन्हेगारी टोळ्यांमधील गुन्हेगार फेसबुकवर दुसऱ्या टोळीबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकतात. अशा प्रकारांची तसेच अशा मजकुराला ‘लाइक’ करणाऱ्यांचीही चौकशी पोलीस करत असून अशा प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. समाजात वावरत असताना गुन्हेगारी कारवाया केल्या किंवा समाजमाध्यमांमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला, तर अशा गुंडांची खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad police started taking action against criminal gangs
First published on: 11-01-2019 at 01:08 IST