‘संकल्पना फलक’ झाकण्यासाठी ६० हजार बंडल चिकटपट्टी

पुणे : सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरात ठिकठिकाणी उभारलेले ‘संकल्पना फलक’ झाकण्यासाठी महापालिकेला सुमारे ६० हजार बंडल चिकटपट्टीचा वापर करावा लागला आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोसायटय़ा आणि गृहप्रकल्पांची माहिती देणारे फलक, भिंतींवर नगरसेवकांनी रंगवलेला मजकूर, पक्षाची चिन्हे आणि चौकांमध्ये उभारण्यात आलेले फलक झाकण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. नगरसेवकांनी ठिकठिकाणी उभारलेले फलक झाकण्यासाठी महापालिकेला आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.

शहरातील छोटे-मोठे गृहप्रकल्प, सोसायटय़ा आदींची माहिती देणारे फलक सर्वपक्षीय नगरसेवकांकडून उभारण्यात येतात. त्याचबरोबर नगरसेवक,आमदार, खासदार यांच्या जनता संपर्क कार्यालयांकडे तसेच निवासस्थानाकडे जाण्यासाठीचे रस्ते दर्शविण्यासाठीही मोठय़ा प्रमाणावर फलक उभारण्यात येतात. प्रभागात किंवा मतदार संघात केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठीही फलकांचा आधार घेतला जातो. त्याखाली ‘संकल्पना’ किंवा ‘सौजन्य’ असा उल्लेख करून संबंधित नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे टाकली जातात. अलीकडच्या दीड वर्षांत तर हा प्रकार मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. नगरसेवक त्यांना अंदाजपत्रकात उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून अशा पाटय़ा उभारतात. याशिवाय महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा, रस्त्यांवरील सीमाभिंतींवरही पक्षाचा प्रचार करणारा मजकूर नगरसेवकांकडून रंगविण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कापडी फलक, झेंडे, बॅनर्सवर प्रशासनाकडून कारवाई सुरू झाली आहे. त्याबरोबर नगरसेवकांच्या संकल्पना असलेल्या पाटय़ा झाकण्यात येत आहेत. कापडी फलक, झेंडे, बॅनर्सवर महापालिकेकडून सातत्याने कारवाई केली जाते. आचारसंहितेच्या कालावधीत या कारवाईला वेग येतो. अलीकडे मात्र नगरसेवकांनी ठिकठिकाणी उभारलेल्या पाटय़ा झाकण्याचे काम वाढले आहे. त्याचा खर्चही महापालिकेलाच सोसावा लागत आहे.

सर्वपक्षीय नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार, माजी आमदार, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी यांनी अशा हजारो पाटय़ा उभारल्या आहेत. दोन फूट बाय तीन फूट हा पाटय़ांचा सर्वसाधारण आकार आहे. जास्तीत जास्त ७ फुटांपर्यंतचे फलकही काही लोकप्रतिनिधींकडून उभारण्यात आले आहेत. मात्र त्यांची संख्या तुलनेने कमी आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे नगरसेवकांच्या या पाटय़ा झाकण्यास सुरुवात झाली आहे. असे फलक झाकण्यासाठी कागद, चिकटपट्टी किंवा काळ्या रंगाचा वापर करण्यात येतो. हा खर्च फारसा मोठा नसल्याचे दाखविण्यात येत असले, तरी तो लाखोंच्या घरात जात असल्याचे स्पष्ट होत आहे. चिकटपट्टीचे एक बंडल २० रुपयांना मिळते. दोन फूट बाय तीन फुटांचे किमान दोन फलक चिकपट्टीच्या एका बंडलात झाकले जातात.

लाख ते सव्वा लाख पाटय़ा

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात किमान एक लाख ते सव्वा लाख पाटय़ा असाव्यात, असा अंदाज आहे. क्षेत्रीय स्तरावर पाटय़ा, फलक उभारण्याचे काम होते. त्यातच एका नगरसेवकाने किती पाटय़ा, फलक उभारावेत, याबाबत स्पष्ट धोरण नाही.