निवासी डॉक्टरांच्या संपातून बाहेर पडण्याचा निर्णय पुण्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी घेतला. संपातून बाहेर पडत असल्याचे पत्र त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना दिले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरांतील शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. 
राज्यातील सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका देत संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे, तर या आदेशानंतरही संप मागे घेतला नाही, तर सरकार संपकरी डॉक्टरांवर आवश्यक ती कारवाई करू शकेल, असे स्पष्ट केले. सरकारनेही संपकरी डॉक्टरांवर अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.