मानवाच्या विकासामध्ये संपूर्ण विश्वामध्ये विजेचे स्थान महत्त्वाचे आणि जीवनावश्यक असेच आहे. विजेमुळे प्रकाश आला, गती आली, ज्ञान सर्वदूर पोचले, जगणे सुलभ झाले. अद्ययावत यंत्र, तंत्रज्ञानामुळे नवनवे रोजगार निर्माण झाले. कुटिरोद्योगांची जागा, औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रांनी घेतली. आता संगणक युगामुळे जग हे छोटे खेडे झाले आहे. या सर्व मूलगामी क्रांतीच्या केंद्रस्थानी वीज आहे, हे वास्तव सर्वज्ञात आहे. विजेची वाढती मागणी काही अनियमितता, नियंत्रणे आणि पर्याय यांचा विचार केला तरी विजेचे मानवी जीवनातील स्थान आता अविभाज्य असेच आहे. जगणे सुलभ व्हावे म्हणून विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक यंत्रे, दैनंदिन वापराची विद्युत उपकरणे तयार होत गेली. नवनिर्मितीची ती प्रक्रिया अखंड चालू होती, आहे आणि राहील. प्रस्तुत लेखामध्ये पुण्यातील विद्युत साहित्य आणि उपकरणांच्या बाजारपेठेचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.

बुधवार पेठेतील पासोडय़ा विठोबा मंदिर परिसरात विद्युत साहित्याची चारशेपेक्षा अधिक दुकाने आहेत. बुधवार चौक ते मोती चौक, तपकीर गल्ली आणि जोड रस्ते, फडके हौद परिसर, सोन्या मारुती चौक, दाट लोकवस्तीच्या व्यापारी पेठेच्या आणि हमरस्त्याच्या आश्रयाने ही बाजारपेठ वसली आहे. विद्युत दिवे आणि जोडसाहित्य, घरगुती वापराची उपकरणे, सजावटीचे साहित्य, लॅम्प शेड्स, टीव्ही, फ्रीज, मिक्सर, फॅन, एअर कंडिशनर, मोबाईल फोन, साऊंड सिस्टिम, अ‍ॅम्प्लिफायर, विद्युत माळा असे अनेक व्यवसाय तसेच दुरुस्ती करणारे, याच बरोबर बिबवेवाडी, कोथरूड, मुकुंदनगर, सहकारनगर, सदाशिव पेठ, पिंपरी अशा उपनगरी परिसरातही ही बाजारपेठ विस्तारली आहे.

एखादी बाजारपेठ त्याच भागात का आली, कशी तयार झाली याचा वेध घेतला तर शहर विकासाचा रंजक इतिहास आणि बदलत्या जीवनशैलीचा पट डोळ्यासमोर येतो. विद्युत साहित्याच्या बाजारपेठेत फिरतानादेखील हाच प्रत्यय आला. त्याचबरोबर, वेगाने विकसित होणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाचे सार्वत्रिक दृश्यस्वरूप घरादाराच्या कानाकोपऱ्यात कसे पोचले आहे, त्याचे देशाच्या दृष्टीने जीवनशैलीच्या दृष्टीने परिणाम कसे झाले आहेत, हे पण जाणून घेण्याची उजळणी झाली.

बुधवार पेठेत मुख्यत्वे तपकीर गल्ली आणि पासोडय़ा विठोबा परिसरात पूर्वी काही मोजकीच रेडिओविक्रीची दुकाने होती. टी.व्ही. येण्यापूर्वी घराघरात रेडिओ हेच ज्ञानाचे आणि जनरंजनाचे मुख्य साधन होते. रेडिओ, टीव्ही, टेप रेकॉर्डर, साऊंड सिस्टिम, अ‍ॅम्प्लिफायर, ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट आणि आता संगणक युगात सीडी, पेन ड्राईव्ह याच्याही पुढे तंत्रज्ञानाबरोबरच विकासाची वाटचाल आहे. ग्रामोफोन रेकॉर्डच्या जागी पेन ड्राईव्ह, इअर फोन आले. देवघरासमोर निरंजन, समयीबरोबरच लखलखत्या विद्युतदीपांच्या माळा आल्या. पाटा वरवंटय़ाची जागा मिक्सरने घेतली. गार पाण्याच्या माठाबरोबर घराघरात फ्रीज, एअर कंडिशनर आले. मोबाइल फोनच्या विश्वामध्ये तर सर्वाधिक वेगवान क्रांती आहे. पेजर असणाऱ्या धनिक मंडळींचा रूबाब आणि आता झाडूवाल्या मंडळींच्या देखील हातात असणारे अ‍ॅन्ड्रॉईड फोन या आणि अशा असंख्य बदलांचे आपण साक्षीदार आहोत. बाजारपेठेत अशा सर्व बाबींचे पडसाद हे उमटत असतातच!

रेडिओ विक्रेत्यांची मोजकीच दुकाने असलेल्या १९६० पूर्वीच्या बुधवार पेठेचे रूपांतर आता विद्युत साहित्याच्या बाजारपेठेत झाले आहे. नाथ रेडिओ हे १९४४ साली सुरू झालेले देशपांडे परिवाराचे दुकान, सिद्धेश्वर, जीजे घैसास, बेहरे मंडळी, जोगदेव आणि कंपनी, कॅम्पमधील रुस्तुमजी, बॉम्बे लाईट हाऊस आणि एडिसन इलेक्ट्रिकल्स ही मंडळी सुरुवातीच्या काळातील व्यावसायिक मानले जातात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर फाळणीमुळे विस्थापित झालेल्या अनेक सिंधी बांधवांनी मुंबई, पुण्यात स्थलांतरित होऊन उल्हासनगर, पिंपरी आणि बुधवार पेठ, शनिवार वाडा परिसरात व्यवसाय सुरू केले. सध्याच्या मजूर अड्डा चौक ते पासोडय़ा विठोबा रस्ता या भागात अशा मंडळींनी रस्त्याकडेला फुटपाथवरच रेडिओ पूरक असे व्यवसाय सुरू केले. याच मंडळींच्या पुढील पिढय़ांनी जम बसल्यावर रीतसर दुकाने थाटली, अशी माहिती विजय देशपांडे यांनी दिली. सुरुवातीच्या काळात मोजकी ब्राह्मण मंडळी या व्यवसायात होती. पानशेत पुराच्या आघातानंतर हळूहळू नागरी वस्तीची बुधवार पेठ बाजारपेठ होत गेली. कालांतराने सिंधी आणि मारवाडी मंडळी बहुसंख्येने या व्यवसायात आली. बुधवार पेठ परिसरातून फिरताना आता मोजक्याच जुन्या वाडे, चाळींचे अवशेष दिसतात. त्याचबरोबर नगरकर वाडा, प्रार्थना समाजाची वास्तू, पासोडय़ा विठोबा मंदिर या वास्तू इतिहासाच्या पाऊलखुणा दर्शवतात. लखलखत्या बाजारपेठेतून फिरताना हा सर्व प्रत्यय येत राहतो.

तंत्रज्ञान आणि बाजारपेठ जशी विकसित होत गेली तशाच व्यावसायिकांच्या संघटना अस्तित्वात येत गेल्या. पूना रेडिओ डीलर्स असोसिएशन ही संघटना १९५० ते १९५७ या काळात कार्यरत होती. कालांतराने तिचे पूना इलेक्ट्रिक असोसिएशनमध्ये विलीनीकरण झाले. सुरुवातीला दीडशे सभासद असलेल्या संघटनेचे आता सुमारे पस्तीसशेहून अधिक व्यावसायिक संबंधात आहेत. पूरक व्यवसाय करणारे आणि सभासद नसलेल्यांची संख्या विचारात घेता हीच संख्या दुपटीपेक्षा अधिक होते. विशेषत: २००० सालानंतर या व्यवसायाचे स्वरूप अधिक व्यापक होत गेले आहे. बदलते जीवनमान, आर्थिक समृद्धी, राजकीय धोरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे तत्परतेचे परिणाम या व्यवसायावर होताना दिसतात. चीनमधून आयात होणाऱ्या मालाचे प्रमाण चाळीस टक्क्यांवर असल्याची माहिती मिळाली.

जमा-खर्चाच्या ताळेबंदात कोणताही व्यवसाय बंदिस्त असला तरी समव्यावसायिक आणि सामाजिक बांधीलकीचे अनेक उपक्रम संघटना राबवीत असते. मालक आणि कामगारांची संख्या २५००० च्यापुढे जाते. सभासदांचे मेळावे, कार्यकारिणीच्या नैमित्तिक बैठका यातून सुसंवाद साधला जातो. संस्थेतर्फे अनेक वर्षे पिया न्यूज नावाचे पाक्षिक प्रसिद्ध होत गेले. वार्षिक डायरी प्रकाशित होते. कला, क्रीडा, आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक मदतीबरोबरच सहलींचेही आयोजन केले जाते. संभाव्य अनिष्ट घटना तसेच चुकांबाबत जागृती होते. बाजारपेठेतील नव्या उत्पादनाची एकत्रित माहिती दिली जाते. संघटनेचे पदाधिकारी आणि नव्या जुन्या पिढीतील सक्रिय सभासदांचा उल्लेख इथे महत्त्वाचा ठरतो. शेखर चौधरी, केशव बेहरे, किसन परमार, विश्वनाथ देशपांडे, हेमंत जोगदेव, एस. एन. तुळपुळे, सुरेश जेठवानी, हेमंत शहा, विजय दासवानी आणि सहकाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. व्यवसायाचा आणि संस्थेचा लौकिक वाढविण्यास विलास शहा, जयू ठाकूर, भगवान पमनानी, सुहास गीते, विजय देशपांडे या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख आवश्यक ठरतो.

परकीय आव्हानांबरोबरच देशांतर्गत बदल समजून घेणे उपयुक्त ठरते. पारंपरिक दुकानांबरोबरच अत्याधुनिक मॉल्सची संख्या वाढली. संगणक युगामध्ये ऑनलाईन खरेदीचा फंडा नव्या पिढीला भुरळ घालतो आहे. उत्सवप्रियतेमुळे रोषणाई आणि साऊंड सिस्टिमचा दणदणाट वाढला, त्याचबरोबर प्रदूषण जागृतीने कठोर प्रशासकीय बंधने येत आहेत. विजेच्या अनियमिततेमुळे जनरेटर, इन्व्हरटर, यूपीएसचा व्यवसाय वाढला आणि सौरऊर्जेबरोबर आता पवन ऊर्जेचाही मोठा उद्योग व्यापार वाढतो आहे. बाजारपेठेतून सजगतेने भ्रमंती करताना जिभेचे चोचले पुरवणारी काही जिव्हाळ्याची ठिकाणे अनुभवायचीच असतात. पासोडय़ा विठोबाजवळ नामदेव सपकाळांची मटकी भेळ, वैद्य उपाहारगृहाची मिसळ, जोशी रिफ्रेशमेंटचा (यात्रिक) इडली-वडा सांबार, दुकानपोच सव्‍‌र्हिस देणारा गोवर्धनचा कटिंग चहा, सीताराम आणि उत्तमची मिठाई हे या बाजारपेठेचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

परंपरा जपण्याबरोबरच आधुनिकतेचा झगमगाट जाणून घ्यायचा असेल तर सजगतेने या बाजारपेठेची एकदा तरी भ्रमंती हवी!