पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या दरम्यान मृत्यू होणार्‍या रुग्णांच्या संख्येतही वाढ होते आहे. सध्याच्या घडीला शहरातील मृत्युदर २.४० टक्के इतका असून हे प्रमाण अजून खाली आणायच्या दृष्टीने करोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज प्लाझ्मा दानसाठी रक्ताचे नमुने दिले आहेत.

यावेळी महापौर मोहोळ म्हणाले, “पुणे शहरातील करोना बाधित रुग्णाची संख्या ९४ हजाराच्या पुढे गेली असून त्या दरम्यान २ हजाराहून अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ७६ हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहे. या आकडेवारीवरून शहरातील करोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर २.४० टक्के इतका आहे”. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक नागरिकाला प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन येत आहे. त्या आवाहनाला नागरिकांचा आतापार्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून ७५० करोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आले आहेत. आता मी देखील प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.