माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत या सगळ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ मिळावी असा अर्ज पुणे पोलिसांनी न्यायालयात केला. या अर्जावर उद्या सकाळी १० वाजता सुनावणी होणार आहे. पोलिसांच्या अर्जावर संध्याकाळी ४ वजात सुनावणी केली जावी अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केली होती.

मात्र बचाव पक्षाचे वकील संजय नहार आणि राहुल देशमुख यांनी या मागणीला आक्षेप घेतला. आरोपींना अर्ज अभ्यासणासाठी वेळ मिळावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. तसेच सोमवारी यासंदर्भातली सुनावणी ठेवावी अशी मागणी करण्यात आली. मात्र सरकारी पक्षाने याला विरोध केला. सोमवारी उच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी असल्याने तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर मध्यम मार्ग काढत अर्जावर सकाळी १० वाजता सुनावणी होईल असे के. डी. वडणे यांनी स्पष्ट केले. सोमवारी या प्रकरणाला ९० दिवसांचा कालवाधी पूर्ण होतो आहे. आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली नाही तर जामिनासाठी अर्ज दाखल करून तो मिळवणे सोपे जाणार आहे. आता काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.