पुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवाला देशभराच्या कानाकोपऱ्यातून रसिक प्रेक्षक येत असतात. या कार्यक्रमाला येणारे प्रेक्षक कुठेही वाहने पार्क करत असल्याने पुणेकरांना त्रास सहन करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर बालगंधर्व मंदिराच्या शेजारी असलेल्या पुलावर पार्क करण्यात आलेल्या ६० पेक्षा जास्त चारचाकी वाहनांना वाहतूक पोलिसांनी जॅमर लावले. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी ही कारवाई केली.

पुणेकर खरेतर सवाई गंधर्व महोत्सवाची वाट बघत असतात. तीन दिवसांपूर्वीच या महोत्सवाला अत्यंत दिमाखात सुरुवात झाली. या महोत्सवाचे यंदाचे ६५ वे वर्ष आहे. या महोत्सवाला यावर्षी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. मात्र वाटेल त्या ठिकाणी वाहने पार्क केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. प्रामुख्याने बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या पुलावर गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने लावली जात आहेत. यामुळे नागरिकांनी याविरोधात तक्रारी केल्या. ज्या तक्रारींची दखल घेत पुणे वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली.