जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे बेकायदेशीररीत्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून बैलांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी शंकर देवराम भवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर नामदेव काटे, कृष्णा विष्णू थोरात, प्रकाश देवराम गाडगे, परशुराम सुभाष लगड, घनशाम किसन गाडगे, सुभाष मारुती भालेराव, शरद दत्तात्रय गाडगे, भागाजी रामभाऊ गाडगे, साकपान शिवराम गाडगे आणि बाळू बबन गाडगे (रा. सर्व- निमगाव सावा, ता. जुन्नर) यांच्या विरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव सावा गावाच्या हद्दीत खंडोबा मंदिराजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या बैलगाडा शर्यतीला उच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अनुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करू नका म्हणून नोटीस बजावली होती. तरीही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले गेले. या घाटात चढ आहे. त्यामुळे बैलांना क्षमतेपेक्षा जोरात पळवून त्यांना चाबकाने क्रूरतेने मारहाण करून छळ करण्यात आला. त्याबरोबरच सरकारी आदेशाचा भंग करण्यात आला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पी. डी. गायकवाड यांनी सांगितले, की नोटीस बाजवल्यानंतर देखील शर्यतीचे आयोजन केले गेले. त्यामुळे आदेशाचा भंग झाला आहे.