स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ता मेळाव्यात खा.राजू शेट्टी यांच्याकडून कार्यकर्त्यांना धडे
चळवळीमध्ये काम करताना कार्यकर्ते पदरमोड करून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे काम करीत असतात. काम करताना यश आले नाही, कमी पडलो किंवा समाजाने दखल घेतली नाही म्हणून अपयशाने खचून जाऊ नका, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना शुक्रवारी धडे दिले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजकारण, आवश्यक तेथे राजकारण आणि प्रसंगी गनिमी कावा देखील केला पाहिजे, असे सांगताना चळवळीला स्वार्थाचे साधन न बनविता आपण चळवळीचे साधन झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेअंतर्गत स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन शेट्टी यांच्या हस्ते झाले. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. जािलदर पाटील, युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे या वेळी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना ही विचारांची शिरोदी घेऊन चालणारी चळवळ आहे. नेतृत्व मार्ग सोडून जात असेल, तर त्याला योग्य मार्गावर आणण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे, असे सांगून शेट्टी म्हणाले, चळवळ हेच एक विद्यापीठ आहे. त्यामध्ये कार्यकर्ते घडत असतात हे खरे असले, तरी त्यांना स्वयंअध्ययन करण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात. बुद्धी आणि पैसा देऊन काम करताना मी कुणाचाही गुलाम नाही अशी कार्यकर्त्यांची भावना असेल, तर त्यात चूक काही नाही. वैचारिक पायाला धक्का न लावता काही गोष्टी साध्य करण्यात गैर नाही. मात्र, चळवळीचे काम करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये ही दक्षता घेतली पाहिजे.
एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या बळिराजाला मानभावीपणे बचतीचा सल्ला दिला जातो. अदानी आणि अंबानी यांचे उद्योग देखील एवढे उत्पादन देत नाहीत, याकडे लक्ष वेधून शेट्टी म्हणाले, उद्योगात कामगारांचे आणि कच्चा माल पुरविणाऱ्यांचे, शिक्षणामध्ये विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांचे, तर व्यापारामध्ये ग्राहक आणि पुरवठादारांचे शोषण होत असते. कोणाचेही शोषण होत नाही असा शेती हाच एकमेव व्यवसाय आहे. शेतकरी कायम गरीब असून त्याला जबाबदार कोण याचा शोध कार्यकर्त्यांनी घ्यावा. बळिराजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देणे हे उद्दिष्ट असले पाहिजे.

खा.राजू शेट्टींचा सल्ला
संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सामान्यांना आधार आणि लुटारूंना दरारा वाटला पाहिजे. याच्या उलट घडू लागले तर आपला मार्ग भरकटला हे ध्यानात घ्यावे. शिक्षणासाठी शहरात आला असला, तरी आपल्या गावाला आणि मातीला विसरू नका, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला.