छताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लीलया झेप घेणाऱ्या, गरगर फिरणाऱ्या मोठमोठय़ा चक्रांवर स्वत:चा तोल सांभाळणाऱ्या आणि उंचावर बांधलेल्या दोरीवरही अगदी सहजपणे चालणाऱ्या कलाकारांच्या चित्तथरारक करामती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तर वेगवेगळ्या रंगांच्या पोशाखांमध्ये सजलेल्या विदूषकांचे विनोद पाहण्यात लहानगे रमून जाणार आहेत. डेक्कन येथील नदीपात्रात रँबो सर्कस आली असून पुढचे ४५ दिवस ती पुणेकरांचे मनोरंजन करणार आहे.
रविवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सर्कसचे उद्घाटन करण्यात आले. रँबो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप, भागीदार सुजित दिलीप, प्रदीप अगरवाल, तसेच देशातील सर्कशीच्या खेळांचे जनक विष्णुपंत छत्रे आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्कस कलावंत दामू धोत्रे यांचे वारस या वेळी उपस्थित होते.
सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ आणि सायंकाळी ७ असे खेळ करण्यात येणार आहेत, तर शनिवार व रविवारी दुपारी १, ४ आणि सायंकाळी ७ असे तीन खेळ केले जातील. अनाथ मुलांना तसेच दृष्टिहीन व अपंगांना या खेळांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
देशात केवळ १८ ते २० मोठय़ा सर्कस शिल्लक राहिल्या असल्याची माहिती सुजित दिलीप यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘मैदानांची भाडी, वीज आणि डिझेलचा खर्च वाढल्यामुळे सर्कसवरील खर्चाचा बोजा वाढला असून वाघ, सिंह, अस्वल अशा प्राण्यांना सर्कशीत काम करायला लावण्यास बंदी असल्यामुळे या खेळाला उतरती कळा आली आहे. सर्कशीत हत्तींची कामे करण्यावर बंदी आणण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे सर्कस टिकेल की नाही अशी काळजी वाटते. सर्कशीला बालकामगार कायदाही लागू झाल्यामुळे लहान मुलांना कसरतींचे प्रशिक्षण देता येत नाही. त्यामुळे यापुढे सर्कस कलावंत तयार होतील का याचीही शंका वाटते.’’     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rambo circus riverside show
First published on: 03-02-2015 at 03:05 IST