शिवाजी खांडेकर

पिंपरी-चिंचवडमध्ये शेकडो गृहनिर्माण सहकारी संस्थांची नोंदणी झालेली असली तरी ती कागदोपत्री आढळून येत नाही. ही समस्या लक्षात घेऊन शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांची माहिती संकलित केली जात आहे. येत्या वर्षभरात नगर भूमापन विभागाकडून सर्व संस्थांची नोंदणी मिळकत पत्रावर करण्यात येणार आहे. या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५० संस्थांची नोंदणी मिळकत पत्रावर करण्यात आली आहे. त्यासाठी भूमापन विभागाचे अधिकारी त्या त्या गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन प्रत्यक्ष नोंदणी करण्याचे काम करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दोन हजाराहून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. त्यातील बहुतांश गृह संस्थांची नोंद कागदोपत्री आढळून येत नाही. मोठय़ा इमारतींमध्ये शेकडो नागरिक वास्तव्य करत असताना त्या इमारतींची नोंदणी सातबारा किंवा मिळकतपत्रावर दिसून येत नाही. त्यासाठी पिंपरीच्या नगर भूमापन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० गृहनिर्माण संस्थांच्या मिळकतीची नोंदणी मिळकत पत्रावर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडलगतच्या गावांचा समावेश पिंपरी -चिंचवड महापालिकेमध्ये १९९७ मध्ये झाला. हद्दवाढ भागातील गृहनिर्माण संस्था सोडून जुन्या महापालिका हद्दीतील सर्व गृहनिर्माण संस्थांची नोंदणी मिळकत पत्रावर करण्यात येत आहे. नगर भूमापन विभागाच्या मोहिमेमुळे कोटय़वधी रुपये मूल्य असलेल्या इमारतीचा मालकी हक्क इमारतीमध्ये राहणाऱ्या सभासदांना मिळणार आहे.

नगर भूमापन विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत दुहेरी उद्देश साध्य होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारचा कोटय़वधी रुपयांचा शेतसारा वसूल होत नव्हता. मिळकत पत्रावर नोंदणी झाल्यामुळे शेतसारा वसूल होऊ लागला आहे. याशिवाय गृहसंस्थांमधील सभासदांनाही मालकी हक्क मिळणार आहे.  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पिंपळे निलख, वाकड, ताथवडे, मोशी, भोसरी, पिंपळे गुरव, चिखली अशा अनेक भागांत बांधकाम व्यावसायिकांकडून मोठय़ा इमारती बांधून त्यातील सदनिकांची विक्री करण्यात आली आहे. शिवाय अशा इमारतींमधील सभासदांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्या संस्थेची नोंद मिळकत पत्रावर न करता सभासदांची आजपर्यंत फसवणूक करण्यात आली होती. नगर भूमापन विभागाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना दिलासा मिळणार आहे.

महापालिकेच्या हद्दवाढ भागातील गृहनिर्माण संस्था सोडून जुन्या महापालिका हद्दीतील गृह निर्माण संस्थांची नोंदणी मिळकत पत्रावर करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शिवाजी भोसले, नगर भूमापन अधिकारी, पिंपरी