पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पाच पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. निश्चित केलेल्या पाच नावांचा अहवाल अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या पाचमधून राज ठाकरे एका नावाची घोषणा करणार आहेत. मात्र सध्याच्या नावांबरोबर भविष्यात आणखी काही नावांची चर्चा होऊ शकते, असा दावा मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यासह राज्यातील काही ठिकाणी मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली आहे. त्यादृष्टीने पुण्यात मनसेची संघटनात्मक बांधणी सुरू झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पुणे दौऱ्यावर येत असून विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकाही पक्षाच्या स्तरावर सुरू झाल्या आहेत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना पुणे लोकसभेच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा – पाकिस्तानच्या क्रमांकावरून संदेशाद्वारे धमकी; ‘कैदीयोको छोड दो, वरना…

लोकसभेची निवडणूक एप्रिल- मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली होती. त्यानुसार पक्षाने माजी गटनेते वसंत मोरे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे आणि गणेश सातपुते या पाच जणांची नावे राज ठाकरे यांना कळविली आहेत. या नावामधून एका नावाची घोषणा राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवारीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी अजून वेळ आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या नावांमध्ये काही नावांचा समावेश होऊ शकतो, असे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – धक्कादायक: अभ्यास करण्यावरून आई मुलाला रागावली, १३ वर्षीय मुलाने घेतला गळफास

अमित ठाकरे उमेदवार ठरविणार ?

राज यांचे चिरंजीव अमित यांना पुणे लोकसभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने अमित सातत्याने बैठका घेत असून संघटनात्मक बांधणीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी असल्याने पुण्यातील उमेदवार निश्चित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report of mns candidates for pune lok sabha ready know who are the potential candidates pune print news apk 13 ssb
First published on: 02-02-2024 at 21:19 IST