मुंबईच्या केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देत ससून रूग्णालयातील निवासी डॉक्टरही रविवारी रात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात शुक्रवारी एका लहान मुलाच्या मृत्यूनंतर रुग्णाच्या संतप्त नातेवाइकांनी निवासी डॉक्टरला मारहाण केली. त्या पाश्र्वभूमीवर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने संप सुरू केला आहे. ससून रूग्णालयातील डॉक्टरही या संपात रविवारी रात्रीपासून सहभागी होणार आहेत. रात्री ८ वाजल्यापासून ससूनमधील चारशे निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या ’मार्ड’ संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. निलेश बाष्टेवाड यांनी दिली. केईएम मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करा, अशा संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.