घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटरला ३० ते ६० पैसे,तर औद्योगिक वापरासाठी सहा रुपये ते ९० रुपयांनी वाढ

जलसंपदा विभागाकडून राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटरला ३० ते ६० पैसे, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांना प्रति हजार लिटरला ६.२० ते १२.४० रुपये आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रति हजार लिटरला ४५ ते ९० रुपये वाढ करण्यात आली आहे. नवे दर शुक्रवारपासून (१ जुलै) सुरू झालेल्या जलवर्षापासून लागू करण्यात आले. या दरात सन २०२३-२४ मध्ये दहा टक्के, तर सन २०२४-२५ या जलवर्षासाठी २० टक्के वाढ होणार आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून (महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ॲथॉरिटी – एमडब्ल्यूआरआरए) राज्यातील सर्व धरणांमधून वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे दर ठरवण्यात येतात. त्यानुसार सन २०१८ मध्ये पाणीदर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षीच पाण्याचे नवे दर निश्चित होणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करता आले नव्हते. त्यामुळे विद्यमान दरांना एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३० जून २०२२ रोजी संपली. त्यानुसार जलसंपत्ती प्राधिकरणाकडून फेब्रुवारी महिन्यात राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीवापराचे दर प्रस्तावित करण्यात आले होते. या दरांबाबत हरकती, सूचना मागवण्यात येऊन नवे दर एप्रिल महिन्यात निश्चित करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींनी धरणातून पाणी घेतल्यास त्यांना सध्या प्रति हजार लिटर १५ पैसे असा दर होता. तो प्रति हजार लिटर ३० पैसे करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनी कालव्यातून पाणी घेतल्यास सध्या प्रति हजार लिटर ३० पैसे असा दर होता, तो प्रति हजार लिटर ६० पैसे असा करण्यात आला आहे. नगरपंचायत, नगरपालिकांनी धरणातून पाणी घेतल्यास त्याचा दर प्रति हजार लिटर १८ पैसे असा होता, तो प्रति हजार लिटर ३५ पैसे करण्यात आला आहे. तसेच कालव्यातून पाणी घेतल्यास प्रति हजार लिटर ३६ पैसे असा दर होता, तो प्रति हजार लिटर ७० पैसे करण्यात आला आहे.

दरम्यान, मंजूर पाणी कोट्यापेक्षा १०० ते १२५ टक्के जादा पाणीवापर केल्यास महापालिकांना अनुज्ञेय दराच्या दीडपट, १२५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीवापर केल्यास अनुज्ञेय दराच्या तिप्पट दर आकारण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी नैसर्गिक प्रवाहात किंवा कालव्यात सोडण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमाणित मानकांनुसार प्रक्रिया करणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पाणीवाटपाच्या आधारावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थापित केला नसल्यास किंवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यास मंजूर पाणीकोटा किंवा प्रत्यक्ष पाणीवापर यापैकी जे अधिक असेल त्याच्या दुप्पट दंड आकारणी केली जाणार आहे.

पाणीप्रकार विद्यमान दर वाढीव दर झालेली वाढ (प्रति हजार लिटरमध्ये)

घरगुती (थेट धरणातून) ०.२५ पैसे ०.५५ पैसे ३० पैसे

घरगुती (कालव्यातून) ०.५० पैसे १.१० रुपये ६० पैसे

औद्योगिक प्रक्रिया उद्योग (थेट धरणातून) ४.८० रुपये ११ रुपये ६.२० रुपये

औद्योगिक प्रक्रिया उद्योग (कालव्यातून) ९.६० रुपये २२ रुपये १२.४० रुपये

कच्च्या मालावर प्रक्रिया कणारे उद्योग (थेट धरणातून) १२० रुपये १६५ रुपये ४५ रुपये

कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग (कालव्यातून) २४० रुपये ३३० रुपये ९० रुपये