मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमधील सभेतून अनेक मोठी विधानं केली. त्यापैकी एक म्हणजे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर आज(मंगळवार) इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना आक्षेप नोंदवला.

पुणे पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना श्रीमंत शिवाजी कोकाटे म्हणाले की, “राज ठाकरे इतिहासाची मोडतोड करत आहे. या गोष्टीला आमचा आक्षेप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली आणि तिचा शोध महात्मा फुले यांनी घेतला. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेशी आम्हाला देणे घेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा कोणत्याही राजकीय पक्षाने वापरु नये, त्याला आमचा विरोध असून राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंडयावर मुद्रा वापरली आहे, त्याला आमचा विरोध आहे.”

तसेच, “जबाबदार नेत्याने अभ्यासपूर्ण बोलायला हवे, जाती जातीत तेढ निर्माण करणे हे लोकनेत्याचं लक्षण नाही. राज ठाकरे हे पुरंदरे, टिळक यांचं समर्थन करतात. यातून त्यांची विचारधारा स्पष्ट होते. राज ठाकरे पुरंदरेंच्या प्रेमात अडकले आहेत, त्यांना इतर काही समजून घ्यायचे नाही. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा एक दगड ही बांधला नाही. या उलट शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी स्मारकाच्या कामासाठी वापरला नाही. राज ठाकरेंचे जातीयवादी आहे म्हणून टिळक आणि पुरंदरे यांचे समर्थन करतात. त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो.” असं म्हणत कोकाटे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका देखील केली.