शिकाऊ वाहन परवान्याचा (लर्निग लायसन्स) अर्ज करण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण हा अर्ज करण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या राज्यव्यापी सुविधेची सुरुवात पुण्यातून करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
पाटील म्हणाले, की शहरामध्ये शिकाऊ वाहन परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या परवान्यासाठीचा अर्ज घरूनच भरता यावा व त्यामुळे कार्यालयात येण्याचा हेलपाटा वाचावा, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयात होणारी गर्दीही कमी होऊ शकेल. अशा प्रकारची योजना पक्का वाहन परवाना काढण्यासाठीही लवकरच सुरू होणार आहे. शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर चाचणीसाठी संबंधिताला नियोजित वेळ देण्यात येणार आहे. चाचणी कधी होणार हे कळणार असल्याने त्यातून वेळेची बचतही होणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
शिकाऊ वाहन परवान्याचा अर्ज करण्यासाठी vahan.nic.in या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. तेथे ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायामध्ये अर्ज करण्याची व्यवस्था आहे. दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरल्यानंतर परवाना चाचणीसाठी वेळेची निवडही करता येणार आहे. या अर्जाची प्रिंट काढून या प्रिंटसह नियोजित वेळेला चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto learning license online
First published on: 24-07-2014 at 02:40 IST