पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपदावर असतानाही कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडली नाही. मागील महिन्यात चौकशी समितीसमोर अत्यंत तांत्रिक उत्तरे त्यांनी दिली. या सर्व बाबींचा अभ्यास करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती चौकशी समिती अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया देताना “सध्या मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही” असे सदाभाऊ खोत म्हणाले.

सावंत म्हणाले, २५ वर्षे चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याचा गांभीर्याने विचार करीत सदाभाऊ खोत यांनी आजवर संघटनेवर केलेल्या आरोप प्रत्यारोप तसेच त्यांच्यावर मध्यतंरी करण्यात आलेले आरोप लक्षात घेता, त्यांच्यावर हाकालपट्टीची कारवाई करण्यात आली.

तसेच त्यांची सत्तेला चिटकून राहाण्यासाठीची धडपड समितीच्या बैठकीतील उत्तरांमधून दिसून आली आहे. त्याचबरोबर सदाभाऊंनी पुणतांब्यातील शेतका-यांचे आंदोलन फोडले. तसेच स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी देशभरातल्या १५० संघटना एकत्र आल्या. मात्र, हा केंद्राच्या आखत्यारितील विषय असल्याचे सांगत ते यापासून आलिप्त राहिल्याचा ठपकाही यावेळी सदाभाऊंवर ठेवण्यात आला.

सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रीपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे या विषयीचा निर्णय कार्यकारणीची बैठक घेऊन घेतला जाणार असून सरकारमध्ये राहयचे का नाही. याची बैठक आठवडाभरात घेतली जाणार आहे, अशी भुमिकाही सावंत यांनी यावेळी मांडली.

मंत्रीपदाच्या रुपाने सोन्याची कणसे येणारी शेती सदाभाऊ हाती : सावंत

मंत्रीपदाच्या रुपाने सोन्याची कणसे येणारी जी मंत्रालयातील शेती सदाभाऊंच्या हाताला लागली आहे. ती ते सहजा सहजी सोडणार नाहीत ही, अशी स्पष्ट लक्षणे त्यांच्या वागण्यातून दिसत आहेत, अशा शब्दांत दशरथ सावंत यांनी सदाभाऊंवर निशाना साधला.