scorecardresearch

रस्त्यांलगत शेतमाल विक्री; करणाऱ्यांना आठवडे बाजाराची सुविधा

शहरालगतच्या ग्रामीण भागात विविध रस्त्यांच्या कडेला शेतकरी शेतमाल विकतात.

पुणे : शहरालगतच्या ग्रामीण भागात विविध रस्त्यांच्या कडेला शेतकरी शेतमाल विकतात. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यापासून जवळच आठवडे बाजारात शेतमाल विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे. वाहनांमधून प्रवास करणारे अनेक जण शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेला भाजीपाला, फळे खरेदी करतात. या विक्रीमधील सुसूत्रता आणि रस्त्याच्या बाजूला धोकादायकरीत्या होत असलेली विक्री यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेने शहराप्रमाणे ग्रामीण भागात आठवडे बाजाराचा प्रस्ताव कृषी विभागाला पाठवला आहे.

ग्रामीण भागातील विविध महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांलगतच शेतकरी त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी बसतात. अनेकदा खरेदीसाठी थांबलेल्या प्रवाशांची वाहने रस्त्याच्या बाजूने उभी केली जातात. परिणामी वाहतूक कोंडी, अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. यावर ठोस पर्याय शोधण्यासाठी पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या आठवडे बाजाराच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यांमधील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला आठवडे बाजार सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा कृषी विभागाकडून या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू असून करोना काळामुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे म्हणाल्या, ‘शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट ताजा भाजीपाला, फळे उपलब्ध होतात. मात्र, विक्री ही रस्त्याच्या बाजूला होत असल्याने त्यामध्ये धोका संभवतो. म्हणून आम्ही सर्वानी चर्चा करून त्यावर ठोस पाऊल टाकण्यासाठी आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. सदस्यांनी देखील त्यामध्ये काही सूचना केल्या आहेत, त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये असे बाजार रस्त्यांच्या बाजूला होणे आवश्यक आहे. तेथे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकणाऱ्या शेतमालाची विक्री करणे सुलभ होईल. रस्त्यावरून प्रवास करत असलेल्या नागरिकांनाही सोईस्कर असेल त्याचा विचार करण्यात आला असून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर त्याबाबत जनजागृती करण्यात येईल.’

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला आठवडे बाजार सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी जागा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. करोनाचा प्रादुर्भाव असल्याने तालुका स्तरावर पुढे प्रक्रिया झाली नाही, मात्र आता करोनास्थिती आटोक्यात आल्याने अशाप्रकारे बाजार भरविण्याची परवानगी मिळाल्यास आठवडे बाजार घेता येईल. शेतकरी त्यांच्या जमिनीलगत असलेल्या रस्त्यांवर विक्री करतात. त्यांच्यासाठी सोईस्कर अशी जागा मिळाल्यानंतर आठवडे बाजार घेतला जाईल.

– ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sale farm produce along road weekly market facility farmers ysh