सामाजिक अत्याचार रोखण्यासाठी विविध ११ परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ सुरू करण्याबरोबरच जातीव्यवस्थेमुळे होणाऱ्या शोषणापासून मुक्ती देण्यासाठी जाती मुक्ती आंदोलन हे दोन नवे मंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समता भूमी येथील महात्मा फुले वाडा येथे २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता होणाऱ्या मेळाव्यामध्ये या दोन मंचाच्या स्थापनेची औपचारिक घोषणा होणार आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सध्याच्या सामाजिक पाश्र्वभूमीवर भारिप-बहुजन महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष (लेनिनवादी), सेक्युलर मूव्हमेंट, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक जनआंदोलन, श्रमिक मुक्ती दल, सत्यशोधक ओबीसी परिषद, दलित-आदिवासी अधिकार आंदोलन आणि श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) हे विविध पक्ष आणि संघटना यांनी एकत्र येत संघटितरीत्या काम करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, डॉ. भारत पाटणकर, गौतमीपुत्र कांबळे, भीमराव बनसोड, मिलिंद सहस्रबुद्धे, किशोर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रमिक भवन येथे रविवारी झालेल्या बैठकीमध्ये या दोन्ही मंचाच्या कार्यपद्धतीची रूपरेषा निश्चित करण्यात आली.