पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह कोणीही महाराष्ट्रात प्रचारासाठी आले तरी, महाविकास आघाडीच्या किमान ३५ जागा येतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्यांचा पराभव करण्याचे जनतेने ठरविले आहे. गद्दारी गाडायची असून ही कीड आताच नष्ट करावी, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.  तसेच पुणे जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीच्या येतील, असा दावाही त्यांनी केला.

मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या पिंपरीतील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते रविवारी (२८ एप्रिल)  झाले. त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>फळभाज्यांच्या दरात १० टक्के वाढ, पालेभाज्यांचे दर स्थिर

खासदार राऊत म्हणाले,  की महाविकास आघाडीसाठी राज्यभरात सकारात्मक वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. जनता गद्दार आमदारांसोबत गेली नाही.  बारामती, शिरूरमध्ये धमक्या दिल्या जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पोलिसी बळाचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रातील ४८ जागा देशात परिवर्तन घडवू शकतील याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भीती आहे. त्यामुळेच ते सातत्याने महाराष्ट्रात येत असून खोटा प्रचार करत आहेत. मुंबईत आठ सभा घेणार आहेत. कारण, मुंबई तोडायची असून उद्योग गुजरातला घेऊन जायचे आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेली आश्वासने सांगत हिंदू-मुस्लिम वाद सुरू केला आहे. मोदी म्हणजे देशाला लागलेला शाप आहेत. संविधान नष्ट करण्यासाठीच भाजप चारशे पारचा नारा देत आहे. ४ जूननंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत. कामगाराला संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगपतीच्या फायद्यासाठी कामगार, शेतकरी विरोधी कायदे आणले, असेही राऊत म्हणाले.

निवडणूक आयोग भाजपचा गुलाम

 निवडणूक काळात कोणी पंतप्रधान, मंत्री नसतो. परंतु, मोदी आचारसंहितेमध्ये सरकारी फोजफाटा घेऊन भाजपचा प्रचार करत आहेत. इंदिरा गांधी यांनी प्रचारासाठी एका सरकारी कर्मचाऱ्याचा वापर केला म्हणून त्यांना पंतप्रधानपद गमवावे लागले होते. न्यायालयाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला होता. परंतु, आता निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे. गेल्या दहा वर्षात आयोगाचे खासगीकरण झाले असून आयोग भाजपचा गुलाम झाला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.