पुणे : ससून रुग्णालय प्रशासनाने चौकशीसाठी आलेल्या समितीची मंगळवारी चांगली बडदास्त ठेवली. समितीतील सदस्यांसाठी पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याणी मागविण्यात आली. अधिष्ठात्यांच्या दालनात मेजवानी सुरू असताना चौकशीसाठी बोलाविलेल्या कर्मचाऱ्यांना जेवायला जाण्यास मनाई करण्यात आली. समितीचे सदस्य बिर्याणीवर ताव मारत असताना बाहेर परिचारिका आणि कर्मचारी उपाशीपोटी ताटकळत थांबले होते, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ससून सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्याची अदलाबदल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने मंगळवारी ससूनमधील अधिष्ठात्यांपासून आपत्कालीन कक्षातील परिचारिकांसह कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

आणखी वाचा-पुणे : पबमालक, कर्मचाऱ्यांचा जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

समितीच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळीच ससूनला भेट दिली. समितीने सुरुवातीला आपत्कालीन विभागाची पाहणी केली. त्यानंतर रक्त नमुन्यामध्ये अदलाबदल झाली त्या वेळी नेमके काय घडले, याबाबत चौकशी सुरू केली. ही चौकशी दिवसभर अधिष्ठाता कार्यालयात सुरू होती. त्यात घटना घडली त्या दिवशी आपत्कालीन विभागात कार्यरत असलेल्या परिचारिका, कर्मचारी, डॉक्टर, तंत्रज्ञ यांची चौकशी करण्यात आली. तसेच, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांच्यासह अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचीही चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ससूनमधील या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण, छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांचा सहभाग आहे.

आणखी वाचा-Monsoon Update : मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला, पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार

रक्त नमुन्यामध्ये कशा प्रकारे अदलाबदल झाली याची चौकशी समितीने सुरू केली आहे. समितीकडून चौकशीचा अहवाल सरकारला सादर केला जाईल. माझी नियुक्ती राज्य सरकारने केली असल्याने माझ्यावर आरोप करणाऱ्यांना सरकारच उत्तर देईल. -डॉ. पल्लवी सापळे, अध्यक्ष, चौकशी समिती

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sassoons inquiry committees eat biryani and hospital staff and nurses starving pune print news stj 05 mrj
Show comments