रस्त्यावरील सिमेंट कॉंंक्रिटच्या दुभाजकाला धडकून होणाऱ्या अपधातामुळे होणारी हानी टाळणारे कंपोझिट रोड डिव्हायडर, उन्हाळ्यात वाहनांचे टायर फुटू नयेत म्हणून वाहनचालकांच्या मदतीला सेन्सिंग उपकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी फॉल डिटेक्शन जीपीएस ट्रॅकर अशी विविध सात उपयुक्त संशोधने भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने जाहीर केली.

भारती विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत या संशोधनांबद्दलची माहिती देण्यात आली. विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संशोधनांची माहिती दिली. प्रा. डॉ. आर. बी. घोंगडे, प्रा. डॉ. के. बी. सुतार, प्रा. पी. व्ही. जाधव, डॉ. सचिन चव्हाण आणि प्रा. कविता कुलकर्णी यांनी ही संशोधने केली आहेत. या संशोधनामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे.

डॉ. आर. बी. धोंगडे यांनी ‘टायर टेंपरेचर मॉनिटरिंग सिस्टिम’ हे उपकरण तयार केले आहे. यामध्ये वाहनाच्या टायरजवळ मेटल बॉडीवर हीट सेन्सर लावला जाईल. टायरचे तापमान चालकाच्या स्मार्ट फोनवर दिसत राहील. टायरचे तापमान ८० अंश सेल्सिअसपेक्षा वाढले तर स्मार्ट फोनवर ते दिसून येईल. त्यामुळे थोडा वेळ गाडी थांबवणे चालकाला शक्य होईल आणि अपघात वाचतील.

सध्याच्या सिमेंट कॉक्रिट रस्ते दुभाजकावर अपघातात गंभीर दुखापत अथवा मृत्यू होतो. यासाठी ‘कंपोझिट रोड डिव्हायडर’ प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीत रस्ते दुभाजकाच्या बांधणीत ग्लास फायबर इपॉक्सी या साहित्यासह काथ्या, थर्माकोल आणि रबर वापरले तर दुखापत होणार नाही आणि धक्का शोषला जाईल, असे संशोधन करण्यात आले आहे.

चालता चालता वृद्ध माणसे अडखळून किंवा प्रकृती अस्वास्थ्याने पडण्याच्या घटना घडतात. ‘फॉल डिटेक्शन जीपीएस’ या संशोधनात अशावेळी तत्काळ त्यांच्या घरच्यांना कळविण्याची व्यवस्था आहे. जीपीएस ट्रॅकरचा वापर या प्रणालीत करण्यात आला आहे. पारंपरिक चुलीमध्ये इंधन, लाकूड मोठय़ा प्रमाणात वापरले जाते आणि ते हानिकारक आहे. यासाठी ‘बायोमास कूकस्टोव्ह’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये माती आणि धातूपासून बनवलेल्या चुलींच्या रचनेत काही बदल केले तर त्यांची क्षमता वाढते, असे संशोधन करण्यात आले आहे.

पाण्यातील फ्लुरॉइडचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘फ्लुरॉइड रिमुव्हल सिस्टिम’ तयार करण्यात आली आहे. तसेच हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी एक संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये वापरलेली चहा पावडर थोडी प्रक्रिया करून शोषक म्हणून वापरण्यात आली आहे. विमान उद्योगात उपयुक्त ठरेल अशी प्रणालीही तयार करण्यात आली आहे.