मैफलीत तानुपरे लागल्यानंतर गायकाने जोडराग आळवावा, अशी सुरेल ‘शब्द’मैफल पुणेकरांनी रविवारी अनुभवली. साहित्य, कला, चित्रपट, काव्य, पत्रकारिता, राजकारण आणि महात्मा गांधी अशा सर्वच विषयांवर लेखक अंबरीश मिश्र यांच्याशी संवाद प्रत्येकालाच समृद्ध करून गेला. भाषा ही संवादासाठी नाही तर संपर्कापुरती ठेवा, असे सांगत भाषा ही केवळ अर्थार्जनापुरती आणून ठेवण्याचा कट केला गेला, या वास्तवावर मिश्र यांनी बोट ठेवले.




‘शब्द फाउंडेशन’तर्फे सुधीर गाडगीळ यांनी मिश्र यांच्याशी संवाद साधला. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, फाउंडेशनचे विश्वस्त प्रशांत कोठडिया आणि केतन गाडगीळ या वेळी उपस्थित होते.
आईने मराठी भाषा माझ्या पदरात घातली. तिच्यामुळे मी मराठीत लिहायला आणि बोलायलाच शिकलो नाही तर मी विचारही मराठीतच करतो, असे सांगून मिश्र म्हणाले. केवळ दहशत नको म्हणून लेखनासाठी इंग्रजी माध्यम स्वीकारले नाही. सध्याच्या मराठीतून ग्वाही आणि निर्वाळा हे दोन शब्द लुप्त झाले आहेत. आपले जुने शब्द घासूनपुसून वापरले पाहिजेत. शासनाने पुस्तकाचा गाव जरूर करावा, पण, त्याआधी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांचे पगार करावेत. खरं तर मला इंग्रजीचा प्राध्यापक व्हायचे होते. पण, नाही झालो तेच बरे झाले. नाही तर पेपरफुटी प्रकरणात अडकलो असतो, अशी टिप्पणी करून मिश्र म्हणाले, पत्रकारितेमुळे अनेक गोष्टी जवळून समजल्या. आपल्याकडे एक राजकीय प्रक्रिया आहे. अनेक गट-तट निर्माण करून त्यांना आपसात झुंजवत ठेवण्यातून काँग्रेसने पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवली. भाजपला काँग्रेसची जागा घ्यायची असेल, तर भाजपनेही अशी अंतर्गत प्रक्रिया सुरू करावी. सध्या ‘सगळं कसं छान चाललंय’, असे वातावरण असून कोणीच काही बोलत नाही. जणू सर्वानी शांततेचा कट रचला आहे. माधुरी पुरंदरे यांनी भाषेविषयी व्यक्त केलेल्या भावनांमुळे आता शब्दांसाठी काम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे सांगून मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, आधुनिक संपर्क माध्यमांद्वारे वेगवेगळ्या माध्यमांतून, खुणांतूनच आपण व्यक्त होतो. साधनं मिळाली पण, कसं व्यक्त व्हावं हे कळत नाही.
गांधी कुणालाच कळले नाहीत
वडिलांनी आणून दिलेल्या पुस्तकांतून मला महात्मा गांधी यांचे विचार समजले. खरे गांधी काँग्रेसला आणि मोदींनाही समजले नाहीत. तेजस्वी आणि संघर्षमय व्यक्तिमत्त्वाच्या गांधींना तत्कालीन राजकारण्यांनी मवाळ केले, असेही अंबरीश मिश्र म्हणाले. पूर्वीचा चित्रपट साहित्याशी प्रामाणिक होता. कृष्णधवल असूनही त्यात सप्तरंग होते. गीतांमध्ये काव्य आणि संगीतामध्ये माधुर्य होते. आता तसे राहिले नाही. १९६० पासून गुलजार गालीबला खांद्यावर घेऊन निघाले आहेत. गीतांमध्ये काव्याचा अभाव असताना त्यांनी ‘इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रास्ते’ अशी रचना दिली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.