पिंपरी : आजारी महिलेला उपचारांसाठी घेऊन जात असलेल्या मोटारीला वाकड येथे रस्त्यातच अचानक आग लागली. या मोटारीमध्ये चौघेजण होते. त्यातील तिघांना बाहेर पडता आले. मात्र, आगीमुळे आजारी महिला मोटारीत बेशुध्द पडली. त्यामुळे तिला बाहेर काढता आले नाही. या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असताना आग भडकली आणि त्यामध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली.

संगीता मनीष हिवाळे (वय ४४, नखाते वस्ती, सौंदर्य कॉलनी, रहाटणी) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.  संगीता या केंद्र सरकारच्या भोसरी येथील डीटीटीसी येथे नोकरी करत होत्या. संगीता यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी हिंजवडी येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मोटारीतून नेले जात होते. त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०), त्यांची आई माया डॅनियल बोर्डे (वय ६५) आणि मुलगा सायमन मनीष हिवाळे (वय १५, सर्वजण रा. नखाते वस्ती, सौंदर्य कॉलनी, रहाटणी) होते. संगीता यांच्यावर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकत नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना त्याच मोटारीने थेरगांव येथील बिर्ला हॉस्पिटल येथे नेण्यात येत होते. मध्यरात्री सव्वाच्या सुमारास वाकड येथील सयाजी हॉटेलजवळ मोटारीला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर संगीता यांचे इतर नातेवाईक पटकन खाली उतरले. मात्र, आधीच रक्तदाब कमी झालेल्या संगीता मोटारीमध्येच बेशुध्द पडल्या. वृध्द आई, भाऊ आणि मुलाने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. मध्यरात्र झाल्यामुळे आग पाहून मदतीला कोणी आले नाही. रस्त्याने जाणाऱ्या योगेश रामेकर याने अग्निशामक दलाला वर्दी दिली.

घटनेची माहिती कळताच िपपरी,  रहाटणी येथील अग्निशामक दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या. परंतु या गाडय़ा घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोटार जळाली होती आणि आत बसलेल्या संगीता यांचा होरपळून मृत्यू झाला होता. मोटारीमधील हिटिंग केबल आणि जोड यामध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी अशी शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. मोटार संगीता यांचे बंधू जॉन चालवत होते. बहिणीला मोटारीमधून बाहेर काढताना त्यांनाही जखम झाली आहे.