पुणे : पुण्यामधून  कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. पिंपरी चिंचवडमधील रावेतमधून आठ ऊंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुण कुमार चिनाप्पा  (वय २८, रा. कुदपल्ली, जिल्हा कृष्णागिरी, कर्नाटक) आणि  लखन मगन जाधव (वय ३०, रा. करपटे वस्ती रोड, कलावती मंदीर शेजारी, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कृष्णा तुळशीराम सातपुते (वय २४, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. चिनाप्पा हा ट्रकचालक असून लखन हा ऊंट सवारीचे काम करतो. फिर्यादी सातपुते हे वारजे परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना १३ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दूरध्वनी करुन एका वाहनाबद्दल माहिती दिली. रावेतवरुन एक ट्रक निघाला असून त्यामध्ये काही उंट निर्दयतेने कोंबण्यात आले आहेत. उंट कत्तलीसाठी कर्नाटक येथे नेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. त्यानंतर  सातपुते आणि त्यांचे मित्र प्रसाद मारुती दुडे (वय २८, रा. वारजे), अशितोष सुरेश मारणे (वय २७, रा. न-हे), अजय बसवराज भंडारी (वय २८, रा. भुगाव), सागर गोविंद धिडे (वय २८, रा. वारजे) हे  मुंबई-बेगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात थांबले होते. रात्री  पावणेदहाच्या सुमारास ट्रक चांदणी चौकाकडून येणारा ट्रक त्यांनी पाहिला. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला आणि वडगाव पुलाजवळ ट्रक थांबविण्यात आला. ट्रक चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीची चौकशी केली. चालकाने त्याचे नाव अरुण कुमार चिनाप्पा आणि शेजारी बसलेल्याने त्याचे नाव लखन जाधव असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>खेड, हवेलीतील शेतकऱ्यांना लागली लॉटरी… झाले काय?

 ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले. चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आलेले होते. उंटांचे पाय आणि तोंड निर्दयतेने बांधण्यात आलेले होते.  ट्रकमध्ये  चारापाण्याची व्यवस्था  करण्यात आली नव्हती. त्यांना जखमा झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी डायल ११२ दूरध्वनी करुन पोलिसांची मदत मागितली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींकडे उंटांच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ट्रक आणि उंट ताब्यात घेतले.  दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

रावेतवरुन कर्नाटक येथे कत्तलखान्यात नेण्यात येत असलेल्या आठ उंटांची सुटका करण्यात आली. सिंहगड रस्ता पोलिसांनी तक्रारीची  दाखल घेतली आणि त्वरित कारवाई केली. या कारवाईमुळे आठ उंटांना जीवदान मिळाले. त्यांना पांजरपोळ येथे ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना शिवशंकर स्वामी, ऍड.आशिष बारीक यांनी मार्गदर्शन केले, असे शिवराज  संगनाळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smuggling camels from pune to slaughterhouses in karnataka pune print news rbk 25 amy
Show comments