Pune Porsche Crash : पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव धावणाऱ्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दोन संगणक अभियंताचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बिल्डरचा अल्पवयीन मुलगा यावेळी ही कार चालवत होता. त्याच रात्री या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर केवळ १५ तासांत जामिनावर सोडण्यात आले. यामुळे या घटनेबद्दल राज्यासह देशभर संतापाची लाट पसरली होती. त्यातच सोशल मीडियावर एक रॅप साँग व्हायरल झालं होतं. या गाण्यातील मुलगा अल्पवयीन आरोपी असून तो आपल्या कृत्याचे समर्थनार्थ गाणं गात असल्याचे दिसते. त्यामुळे या घटनेबद्दल आणखीच चीड निर्माण झाली होती. आता हे रॅप साँग गाणाऱ्या तरूणाविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण काय आहे?

पोर्श कार अपघातानंतर अतिशय चीड आणणारे रॅप साँग व्हायरल झाले होते. हे गाणं गाणारा मुलगा अल्पवयीन आरोपी असून तो आपल्या कृत्याचे समर्थन करत असल्याचे आणि यानंतरही रस्त्यावर अशाच खेळ करणार असल्याचे सांगतो. या गाण्यामुळे लोकांमध्ये आणखीच चीड निर्माण झाली होती. अखेर अल्पवयीन आरोपीच्या आईला हा आपला मुलगा नसल्याचे सांगावे लागले होते. गुरूवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांनीही हा फेक व्हिडीओ असून अल्पवयीन आरोपीच्या नावाने व्हिडीओ करणाऱ्या या मुलाचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले.

अखेर आज पुणे सायबर पोलिसांनी सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आर्यन देव नीखरा याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ५०९, २९४ ब या कलमांनुसार आता आर्यनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन नीखराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोर्श अपघातामधील आरोपी आणि पीडितांची थट्टा उडविणारा व्हिडीओ तयार करून अपलोड केला होता.

Porsche Accident: “अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी गुन्हा अंगावर घे म्हणत चालकाला..”, अमितेश कुमार यांची माहिती

आर्यन नीखराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी त्याची ओळख उघड केली होती. ज्यामुळे नीखराने माध्यमांना शिवीगाळ करणारे आणखी एक रॅप साँग तयार करून ते इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. तसेच या गाण्यात त्याने अपघातात बळी पडलेल्यांची खिल्ली उडवली होती, अशी बातमी फ्री प्रेस जर्नलने दिली आहे.

दरम्यान पुणे सायबर विभागाने शनिवारी या संबंधी आर्यन नीखरावर गुन्हा दाखल करत असताना त्यांचे गाणे शेअर केलेल्या शुभम शिंदे या तरूणावरही गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : दोन अधिकाऱ्यांना निलंबित करुन कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

कोण आहे आर्यन देव नीखरा?

आर्यनच्या लिंक्डइन प्रोफाइलवरील माहितीनुसार, तो दिल्लीमधील व्हिडीओ क्रिएटर आणि ग्रॅव्हिटी मीडियामध्ये मिम्स मेकर म्हणून काम करतो. आर्यन देव नीखरा मुळचा मध्यप्रदेशमधील असून त्याचे शालेय शिक्षण शिवपुरी येथील हॅप्पी दास स्कूलमध्ये झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्याने ग्वाल्हेर येथील अमित्या विद्यापीठात प्रवेश घेतला.