Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यात एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालवत दोघांना चिरडलं. या भयंकर अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या मुलाला अटक करण्यात आली. मात्र अवघ्या १५ तासांत त्याला जामीन मिळाला. ज्यामुळे प्रचंड संताप व्यक्त झाला. या घटनेची तातडीने दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पोलिसांची बैठक घेतली आणि कुणाचीही गय केली जाणार नाही हे सांगितलं. या प्रकरणात आधी मुलाच्या वडिलांना आणि आज मुलाच्या आजोबांना अटक करण्यात आली आहे. तसंच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आजोबांनी या प्रकरणात त्यांच्या कुटुंबासाठी चालक म्हणून काम करणाऱ्यावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता.

पोलिसांनी मुलाच्या आजोबांना केली अटक

पोलिसांनी आज अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक केली आहे. अल्पवयी मुलाचे आजोबा पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे वडील आहेत. अपघाताच्या वेळी पोर्श कार तू चालवत होता असं पोलिसांना सांग. त्यासाठी त्याला पैशांची ऑफर दिली होती. तसंच चालकाने गुन्हा अंगावर घ्यावा म्हणून त्या डांबूनही ठेवलं होतं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हे पण वाचा- पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप; अजित पवार म्हणाले, “उचचली जीभ अन्…”

काय म्हणाले अमितेश कुमार?

अल्पवयीन मुलाच्या पोर्श धडक प्रकरणाची घटना घडली तेव्हा तो मुलगाच कार चालवत होता. त्याने ते आमच्याकडे मान्यही केलं आहे. तरीही ही घटना घडली तेव्हा मुलगा मागे बसला होता आणि ड्रायव्हर कार चालवत होता आणि त्याच्या हातून अपघात झाला हे भासवण्यात आलं. चालक पोलीस स्टेशनला आला तेव्हा त्याने पहिल्या जबाबात तशीच कबुली दिली होती. मात्र अल्पवयीन मुलगाच कार चालवत होता त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तरीही चालकाने त्याचं म्हणणं सोडलं नव्हतं, चालक सातत्याने हेच सांगत होता की अल्पवयीन मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसला होता. हे असं सांगण्याचं कारण म्हणजे रात्री ११ च्या सुमारास या चालकाला सोडवून घेऊन गेले होते. त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवला आणि त्याला मुलाच्या आजोबांनी डांबून ठेवलं. आम्ही सांगू त्याप्रमाणे जबाब द्यायचा असा दबाव टाकण्यात आला होता. अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

आणखी काय म्हणाले अमितेश कुमार?

दुसऱ्या दिवशी चालकाची पत्नी आणि त्याच्या घरातले सदस्य अल्पवयीन मुलाच्या घरी गेले, तिथे त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्या चालकाला त्याचे घरातले लोक अल्पवयीन मुलाच्या घरुन स्वतःच्या घरी घेऊन गेले. चालक त्याच्यावर टाकण्यात आलेल्या दबावामुळे घाबरला होता. ड्रायव्हरला गिफ्ट आणि पैशांचं आमिष देण्यात आलं होतं अशी माहिती मुलाच्या आजोबांना अटक केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.