आपली नोकरी वा उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक जण काही ना काही सामाजिक काम अगदी मनापासून करत असतात. त्यांच्या या कार्याची माहिती वाचून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.

अडचणी आल्या की त्यांचा सामना करताना अनेकांचा जीव मेटाकुटीला येतो. आपल्या समस्या कितीही असल्या तरीही त्यांना धीराने तोंड देत, समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी आघाडीवर राहणाऱ्या काही व्यक्ती पाहायला मिळतात. अंजली केशव महाजन हे असेच एक धीरोदात्त व्यक्तिमत्त्व.

आपल्या समस्यांबरोबर लढत असताना, इतरांसाठी कार्यतत्पर राहणाऱ्या महाजन या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. सामाजिक कार्याची तळमळ असल्यामुळे मुदतीपूर्वी सेवानिवृत्ती स्वीकारणाऱ्या महाजन यांनी आपल्या मुख्याध्यापिकेच्या कार्यकाळातही अनेक सामाजिक उपक्रम राबवले. प्रौढ साक्षरता, आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात सहभागी होत धान्य संकलन, रस्त्यावर थुंकू नये हा संदेश देणाऱ्या पथनाटय़ाचे ठिकठिकाणी सादरीकरण, या आणि अशा विविध उपक्रमांमधून त्यांचे सामाजिक कार्य सुरूच होते. त्याला अधिक बळकटी मिळाली, ती सेवानिवृत्तीनंतर.

पार्किनसन्सने ग्रस्त असलेल्या पतीची सेवा करण्याबरोबरच १०५ वर्षांच्या सासूबाईंची जबाबदारी निभावतानाच त्यांनी सामाजिक कार्याचा वसाही घेतलेला आहे. आपल्या पतीला आजारपणातून बाहेर काढण्याबरोबरच पार्किनसन्स झालेल्या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना आजाराविषयी मार्गदर्शन करणे, त्यांच्या कुटुंबाने अशा रुग्णांची काळजी घेण्याविषयी माहिती देणे, रुग्णांचे मनोरंजन करणे, इतकेच काय, असा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना रुग्णालयात जाऊन त्याला वेळ देण्याचे बहुमोल कार्य त्या करतात. पार्किनसन्स झालेल्या तीनशेपन्नास रुग्णांची यादी त्यांच्याकडे आहे, त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे, प्रत्यक्ष भेटीतून त्या वेळोवेळी संपर्कात असतात. या रुग्णांना त्या यातनांपासून दूर नेता यावे, यासाठीदेखील त्या सतत प्रयत्नशील असतात. त्यांचे वाढदिवसदेखील त्या आवर्जून साजरे करतात. त्यासाठी स्वत: शुभेच्छापत्रं तयार करतात, त्यांच्यासाठी कवितांच्या माध्यमातून त्यांच्या गुणांचे वर्णन करुन, कविता करुन शुभेच्छापत्रावर लिहितात.

अशा आगळ्या पद्धतीने शुभेच्छा देऊन दुसऱ्यांना आनंद वाटण्याचे कार्य त्या करतात. त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपदेखील केला असून चांगले संदेश, उत्तम माहिती पाठविण्यासाठी या ग्रुपचा उपयोग त्या करतात. कर्करोगाने ग्रस्त मुलीच्या मृत्यूलादेखील तेवढय़ाच धीराने सामोरे जात कर्करोग्रगस्त रुग्णांना मार्गदर्शन, तसेच मदत करण्याचे कार्य अंजलीताई करतात.

ओआरएच निगेटिव्ह या दुर्मीळ रक्ताच्या दाता असणाऱ्या अंजलीताई. त्यांचे रक्त साठवून ठेवता येत नाही. जेव्हा रुग्णाला गरज असेल तेव्हाच जाऊन ते रक्त रुग्णाला द्यावे लागते. त्यामुळे बोलावणे आले की जायचे, या पद्धतीने त्यांनी तब्बल २१ वेळा रक्तदान केले आहे. एकदा रक्तदान करायला गेले असता रक्तदानपूर्व चाचणीमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी आली होती. त्यामुळे अंजलीताईंना रक्तदान करता न आल्याचे दु:ख झाले. त्यानंतर हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात कसे राहिल यासाठी त्या कायम दक्ष असतात. स्वत: रक्तदान करण्याबरोबरच महिलांनी, तरुणाईने रक्तदान करावे म्हणून त्या त्यांना प्रोत्साहित करतात.

मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वानाच मदत करण्याचा उत्साह आणि ते कसब अंजलीताईंच्या अंगी असून न कंटाळता, न दमता, आपल्या गृहस्थाश्रमातील जबाबदाऱ्यांचे भान ठेवत, त्या जपत गरजूंच्या उपयोगी पडण्याचे कार्य त्या करीत आहेत.

शालेय शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यापासून त्या ज्या शाळेत नोकरी करीत होत्या, तेथे काही ठेवी ठेवून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. महिलांनी सक्षम व्हावे म्हणून बिबवेवाडी परिसरात (निवासस्थानाजवळील) महिलांना मार्गदर्शन करतात.

याशिवाय धान्यसंकलन, कपडेसंकलन, दैनंदिन वापराच्या वस्तूंचे संकलन करून त्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

shriram.oak@expressindia.com