जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र

शासनाच्या या निर्णयाचे जुन्नरबरोबरच पुणे जिल्ह्यच्या विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी; ३५० लेण्यांचा एकमेव तालुका

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, सर्वाधिक ३५० लेण्या असलेला पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि महादुर्बीणसारख्या वैज्ञानिक वैशिष्टय़ांनी नटलेल्या जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध केला. शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने सर्वच क्षेत्रांतून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यच्या उत्तरेचे टोक असलेला जुन्नर तालुका इसवीसन पूर्व काळात जीर्णनगर या नावाने सातवाहन राज्यात प्रमुख बाजारपेठ होती. विविध वैशिष्टय़ांनी समृद्ध, त्याचप्रमाणे निसर्गाचे वरदान लाभलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास सर्व वैशिष्टय़ांसह या भागातील निसर्गाची जपणूक होऊन त्याचा लाभ तालुक्यासह संपूर्ण राज्याला होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने जुन्नर तालुक्याचा समावेश विशेष पर्यटन क्षेत्रात करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्य शासनाने या बाबतचा निर्णय जाहीर केला आहे. जुन्नरच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. पर्यटन संचालनालय आणि पर्यटन विभागाच्या वतीने त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीचीही तरतूद होऊ शकणार आहे.

शासनाच्या या निर्णयाचे जुन्नरबरोबरच पुणे जिल्ह्यच्या विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे या बाबत म्हणाले, की राज्यातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून जुन्नर राहणार असल्याने पुढील काळात हा तालुका राज्याचा मॉडेल तालुका ठरेल.

विविध वैशिष्टय़े आणि विकासासाठी नैसर्गिकरीत्या तालुक्याला लाभलेले वैभव या सर्वाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री जयकुमार रावळ, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांनी जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यास अनुकूलता दर्शविली. या बाबत आपणही पाठपुरावा केल्याने शासनाने तालुका विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.

जुन्नर तालुक्याची पौराणिक ते वैज्ञानिक वैशिष्टय़े

  • छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीसह भैरवगड, नारायणगड, हडसर, निमगिरी आदींसह सात किल्ले.
  • सर्वाधिक ३५० लेण्या असलेला एकमेव तालुका. लेण्याद्रीला सातवाहन काळातील लेणीसमूह, मानमोडी डोंगरात जैन देवी-देवतांच्या गुहा.
  • अष्टविनायकांपैकी गिरिजात्मक- लेण्याद्री, विघ्नेश्वर-ओझर ही दोन मंदिरे, हेमाडपंती बांधणीतील तीन कोरीव मंदिरे. जुन्नरचे प्राचीन जैन मंदिर.
  • नाणेघाट- घाटघर, दर्याघाट, आणेघाट- आणे आदी निसर्गरम्य घाट आणि प्रसिद्ध धबधबे.
  • खोडद येथे जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण. जवळच आर्वी येथे दळणवळण उपग्रह भूकेंद्र.
  • गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल कोकणकडे, माणिकडोह येथील कुकडी नदीतील रांजण खाचखळगे, बोरीगावात पुरातनकाळात भूकंप झालेल्या उद्रेकाची राख.
  • लोकनाटय़ तमाशाची पंढरी असलेले नारायणगाव, कृषी पर्यटन केंद्र आणि चातो इंडेज चौदा नंबर येथील आशियातील पहिली वायनरी.

माणिकडोह येथील बिबटय़ा निवारण केंद्र. ३५० वर्षांची परंपरा असलेला बेल्हे गावचा आठवडे बाजार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Special tourism sector to junnar taluka