scorecardresearch

पिंपरीत लावणी महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर करत महिलांची जिंकली मने

Spontaneous response of women to planting festival in Pimpri
पिंपरीत लावणी महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी: शिट्ट्या, टाळ्या अन् जल्लोषपूर्ण खड्या आवाजाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुमदुमून गेले. ‘या रावजी, बसा भावजी’, ‘इचार काय हाय तुमचा’ यांसारख्या रंगतदार लावण्या ढोलकीच्या तालावर रंगमंचावर एका पाठोपाठ सादर करण्यात आल्या. लावणी नर्तिकांनी दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर करत महिलांची मने जिंकली. या लावण्याना महिलांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने वातावरणात रंगत भरली. शिट्ट्या टाळ्यांसोबत लावणी अदाकाराबरोबर सेल्फी घेण्याचा मोह देखील महिलांना आवरता आला नाही.

निमित्त होते लावणी महोत्सवाचे! लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी, पारंपरिक लावणी जपण्यासाठी आमदार उमा खापरे आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय लावणी महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराजाची पूजा करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. लावणीसम्राज्ञी आणि परीक्षक सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांच्यासह खापरे, उबाळे यांच्यासह माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, शैला मोळक आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी स्मृतिचिन्हांचे अनावरण करण्यात आले. महिलांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरले होते.

हेही वाचा >>> लोणावळ्यात शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला, तीन अल्पवयीन मुले ताब्यात

लावणी महोत्सवाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. ‘मी राजसा तुम्हासाठी’ या संघाने पहिल्या लावणीचे सादरीकरण केले. लांवण्यावतींनी पारंपरिक लावण्या सादर केल्या, अदाकारी सादर केल्या. नखशिखांत सजलेल्या नृत्यगंनांनी लावण्या सादर करत महिलांची मने जिंकली. रजनी पाटील पुणेकर, सोनाली जळगावकर यांनी ‘राजसा जगडी बसा, जीव हा पिसा’, ‘खेळताना रंग बाई होळीचा, काट लागे कोना माझा चोळीचा’,  दीप्ती आहेर यांनी ‘इचार काय हाय तुमचा, पाहुणे विचार काय हाय’ ही लावणी सादर केली. महिलांच्या मागणीनुसार ही लावणी ‘वन्समोअर’ झाली. महिलांचा प्रतिसाद पाहता आहेर यांनी मंचावरुन खाली उतरत महिलांमध्ये येऊन नृत्य सादर केले. परीक्षक सुरेखा पुणेकर यांनीही नृत्य केले. श्रृती मुंबईकर यांनी ‘आशिक माशुक’, उर्मिला मुंबईकर यांनी ‘कारभारी जरा दमान’ ही लावणी सादर करत दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर केले. जय मल्हार  कला नाट्य मंडळाच्या संघानेही विविध लावण्या सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा चव्हाण आणि नरेंद्र आंबे यांनी केले.

हेही वाचा >>> पुणे : मोटारचालकाची मुजोरी; वाहतूक पोलिसाला फरफटत नेले

महिलांनी नृत्याचा आनंद लुटला

लावणी महोत्सवात पारंपरिक पद्धतीने लावण्यांचे सादरीकरण झाले. महिलांनी जागेवर उभे राहून लावण्यांना दाद दिली. नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. टाळ्या, शिट्या वाजविल्या. पारंपरिक वेशभूषेत, नववारी, फेटे परिधान करुन महिला आल्या होत्या. महिलांनी लावण्यांचा मनमुराद आनंद लुटला. लावणी महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद मिळाला.

लावणीची देशभरात सर्वांना भुरळ

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित केल्याचा आनंद आहे. आजच्या युगात पारंपरिक लावणी लोप पावत चालली आहे. महाराष्ट्रात लावणी कला अतिशय महत्वाची कला आहे. आजच्या काळात लावणीचे रूप बदलत चालले आहे. त्यासाठी पारंपरिक लावणी जपणे खूप महत्वाचे आहे. लावणीची महाराष्ट्र नव्हे तर देशभरात सर्वांना भुरळ असल्याचे डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले. महिलांना काही तरी वेगळे द्यावे, यासाठी लावणीची लोककला जपण्यासाठी आणि पारंपरिक लावणी जतन करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे आमदार उमा खापरे म्हणाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 18:06 IST

संबंधित बातम्या